पॅरिस: देशातील राजकीय व्यवस्थेवरील संताप आणि सरकारच्या प्रस्तावित खर्चात कपात करण्याच्या धोरणांवरून फ्रान्समध्ये बुधवारी (10 सप्टेंबर) मोठे निदर्शने झाली. आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्ते अडवले, कचरापेट्या जाळल्या आणि पोलिसांशी संघर्ष केला. ‘सर्व काही बंद करा’ (‘ब्लॉक एव्हरीथिंग’) असे या आंदोलनाचे नाव आहे. या आंदोलनात मोठा जनक्षोभ दिसून आला. मात्र याला कोणतेही केंद्रीय नेतृत्व नाही. तसेच सोशल मीडियावरून त्याचे नियोजन झाले आहे.
advertisement
आंदोलन आणि अटक
रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, मे महिन्यात उजव्या विचारसरणीच्या गटांनी सुरू केलेल्या या आंदोलनात आता डावे आणि अति-डावे गट सामील झाले आहेत. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार देशभरात सुरू झालेल्या या आंदोलनात पहिल्या काही तासांतच सुमारे 200 लोकांना अटक करण्यात आली. रस्ते मोकळे करण्यासाठी देशभरात सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले होते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात पोलीस आणि आंदोलक यांच्यात मोठा संघर्ष झाल्याचे दिसून येते. काही व्हिडिओमध्ये आंदोलक रस्त्यावरील गाड्या जाळतानाही दिसले.
राजकीय घडामोडी आणि पार्श्वभूमी
फ्रान्समध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे. देशाचे वाढते कर्ज कमी करण्याच्या उपायांवरून पंतप्रधान फ्रान्सुआ बायरो यांना दोन दिवसांपूर्वीच संसदेत अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात आले होते. यानंतर मंगळवारी (9 सप्टेंबर) राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सेबास्टियन लेकॉर्नू यांची देशाचे 5 वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. लेकॉर्नू हे मॅक्रॉन यांचे निकटवर्तीय मानले जातात. परंतु त्यांच्या या नियुक्तीमुळे डाव्या विचारसरणीचे राजकारणी संतप्त झाले आहेत.
ठिकठिकाणी निदर्शने
देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा मोठा परिणाम दिसला.
नॅंट्स: पश्चिम नांते शहरात आंदोलकांनी जाळलेले टायर आणि कचरापेट्या रस्त्यावर टाकून महामार्ग अडवला. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून निदर्शकांना पांगवले.
मॉन्टपेलियर: नैऋत्येकडील मॉन्टपेलियर शहरात आंदोलकांनी रस्त्यावर अडथळे निर्माण करून वाहतूक थांबवली. आंदोलकांनी पोलिसांवर वस्तू भिरकावल्या. ज्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.
सुरक्षा व्यवस्था आणि तुलना
फ्रान्सचे गृहमंत्री ब्रुनो रेतैलो यांनी सांगितले की- देशभरात 80,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ज्यात पॅरिसमधील 6,000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ‘ब्लॉक एव्हरीथिंग’ हे आंदोलन सध्याच्या सत्ताधारी वर्गाच्या धोरणांविरुद्ध जनतेच्या असंतोषाचे प्रतीक आहे, असे रॉयटर्सने म्हटले आहे. या आंदोलनाची तुलना 2018 मधील ‘यलो वेस्ट’ आंदोलनाशी केली जात आहे. जे सुरुवातीला इंधनाच्या किमती वाढवल्यामुळे सुरू झाले होते. पण नंतर मॅक्रॉनच्या आर्थिक सुधारणांविरोधात व्यापक आंदोलन बनले.
प्रशासनाच्या माहितीनुसार, बॉर्दो शहरात सुमारे 50 लोक रस्ते अडवण्याचा प्रयत्न करत होते. तर तुलुजमध्ये आग लावल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु ती लवकरच विझवण्यात आली. फ्रेंच प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या आंदोलनात एक लाख लोक सहभागी होण्याची शक्यता होती.