काठमांडू: काठमांडूचे महापौर बालेन शाह आणि नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी माघार घेतल्यानंतर नेपाळच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व आता नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीचे प्रमुख अभियंता कुलमान घिसिंग यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. संपूर्ण देशातून लोडशेडिंग (भारनियमन) संपवण्याचे श्रेय घिसिंग यांना जाते. त्यांची प्रतिमा स्वच्छ आणि त्यांची राष्ट्रीय व्यक्तीमत्त्व म्हणून ओळख आहे. देशात नवीन निवडणुका होईपर्यंत ते सरकार चालवणार आहेत.
advertisement
नेपाळमधील भ्रष्टाचारविरोधी आणि सुशासन चळवळीचा भाग असलेल्या ‘जेन झी’ (Gen Z) गटाने ही घोषणा केली आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर) देशाच्या राजकीय संक्रमणातून मार्गदर्शन करण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाचे त्यांनी अभूतपूर्व यश म्हणून स्वागत केले.
अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी सर्वात योग्य उमेदवार म्हणून बालेन शाह यांना पाहिले जात होते. परंतु त्यांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यास सार्वजनिकरित्या नकार दिला. सुशीला कार्की यांनाही जोरदार पाठिंबा मिळाला होता. परंतु त्यांनी संवैधानिक आणि कायदेशीर अडथळ्यांसह स्वतःच्या अनिच्छेमुळे उमेदवारी मागे घेतली. तसेच 70 वर्षांपेक्षा जास्त वय असल्याने त्या ‘जेन झी’ गटाचे नेतृत्व करू शकणार नाहीत, असेही मानले जात होते.
नेपाळी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार ‘जेन-झी’ गटाच्या काही युवा प्रतिनिधींनी लष्कराच्या मुख्यालयात पोहोचून अंतरिम सरकार स्थापनेच्या संदर्भात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये त्यांनाही सहभागी करून घेण्याची विनंती केली आहे.
पंतप्रधानांना पदत्याग करण्यास भाग पाडणाऱ्या आणि संसदेला आग लावणाऱ्या हिंसक निदर्शनांमुळे नेपाळमध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. मंगळवारपासून निदर्शने अधिक तीव्र झाल्याने 30 दशलक्ष लोकांच्या या देशाचा ताबा लष्कराने घेतला आहे.
नेपाळी लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिगडेल यांनी बुधवारी प्रमुख व्यक्ती आणि 'जेन झी' च्या प्रतिनिधींची भेट घेतल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. 'जेन झी' हे तरुण आंदोलकांचे एक अनौपचारिक गट आहे.मात्र या भेटीबद्दल अधिक तपशील देण्यात आला नाही.
दरम्यान नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार काठमांडू खोऱ्यात सुरू असलेल्या ‘जेन झी’ आंदोलनात मृतांची संख्या 34 वर पोहोचली आहे. या निदर्शनांमध्ये 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. द काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील हिंसक निदर्शनांदरम्यान माजी पंतप्रधान खनाल यांच्या पत्नीवर झालेल्या जाळपोळीच्या हल्ल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे.