अवकाशविश्वात सध्या जे काही समोर येत आहे, ते एखाद्या सायन्स फिक्शन थ्रिलरपेक्षा कमी नाही. नव्या अभ्यासातून अखेर हे ठोसपणे सिद्ध झाले आहे की तारे जसजसे वृद्ध होत जातात, तसतसे ते आपल्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांना एक-एक करून ‘गिळंकृत’ करायला सुरुवात करतात. ही अनपेक्षित आणि धक्कादायक वैज्ञानिक शोधमाहिती संपूर्ण खगोलशास्त्र जगतात खळबळ माजवणारी ठरली आहे. हे प्रथमच सिद्ध झाले आहे की एखादा तारा जेव्हा त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या ग्रह-व्यवस्थेतील ग्रह प्रत्यक्षात नष्ट होऊ लागतात.
advertisement
‘मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रकाशित या अभ्यासासाठी वैज्ञानिकांनी 4 लाखांहून अधिक वृद्ध तार्यांच्या पोस्ट-मेन-सीक्वेन्स अवस्थेतील डेटाचे विश्लेषण केले. अभ्यासात आढळले की अशा तार्यांच्या सभोवताल ग्रहांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत जाते. म्हणजे तारा वृद्ध होताच त्याच्या सौरमंडळातील ग्रह एकामागून एक गायब होऊ लागतात.
TESS दूरबिणीच्या (टेलिस्कोप) डेटात संशोधकांना 130 ग्रह दिसून आले. ज्यापैकी 33 ग्रह नवीन उमेदवार (कॅन्डिडेट प्लॅनेट्स) आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे या वृद्ध तार्यांभोवती विशेषतः गॅस जायंट ग्रहांची संख्या सतत घटताना दिसली. तरुण आणि वृद्ध तार्यांच्या तुलनेत हे ग्रह तरुण तार्यांजवळ 0.35% दराने आढळले, पण तार्याचा आकार वाढून तो ‘रेड जायंट’ अवस्थेत पोहोचताच ही संख्या 0.11% पर्यंत कोसळली. यावरून हे स्पष्ट झाले की तारे प्रत्यक्षात त्यांच्या जवळच्या ग्रहांना ‘खाऊन टाकत’ आहेत.
अभ्यासाचे प्रमुख संशोधक एडवर्ड ब्रॅंट यांच्या मते, तारा मेन सीक्वेन्स अवस्था सोडताच त्याची रचना, उर्जा आणि गुरुत्वीय शक्ती इतक्या झपाट्याने बदलू लागतात की तो जवळच्या ग्रहांना प्रचंड शक्तीने स्वतःकडे खेचतो आणि त्यांचा नाश करून टाकतो. या प्रक्रियेबाबत पूर्वी फक्त सिद्धांत होते, पण आता ठोस निरीक्षणीय पुरावे मिळाले आहेत.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार सर्वात मोठा धोका त्या ग्रहांना असतो ज्यांची ऑर्बिटल पिरिएड 12 दिवसांपेक्षा कमी असते. तारा आणि ग्रह यांच्या दरम्यान निर्माण होणारे ज्वारीय बल (टाइडल फोर्सेस) ग्रहाची कक्षा मोडून टाकतात. ग्रह हळूहळू आत ओढला जातो आणि अखेरीस ताऱ्यात विलीन होतो. काहीवेळी हे ज्वारीय बल इतके तीव्र असतात की ग्रह अक्षरशः तुकडे-तुकडे होऊन नष्ट होतो.
या शोधाने आपल्या सूर्यमालेच्या भवितव्यावरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सूर्य पुढील 5 अब्ज वर्षांत ‘रेड जायंट’ अवस्थेत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत बुध (मर्करी) आणि शुक्र (वीनस) या दोन्ही ग्रहांचा अंत निश्चित आहे. पृथ्वीची स्थिती तुलनेने थोडी सुरक्षित असली, तरी त्यावरील जीवनाचे अस्तित्व टिकण्याची शक्यता अत्यंत कमी असेल. अभ्यासाचे सहलेखक विन्सेंट व्हॅन एलन यांच्या मते- पृथ्वी भौतिक स्वरूपात जिवंत राहिली तरी सूर्याची वाढती तिव्रता, तापमान आणि रेडिएशनमुळे जीवन टिकणे जवळजवळ अशक्य होईल. सध्या झालेल्या अभ्यासात वृद्ध तार्यांच्या आयुष्याच्या फक्त सुरुवातीच्या दोन दशलक्ष वर्षांची तपासणी झाली आहे. पुढील टप्पे आणखी भयानक असू शकतात, असा संशोधकांचा इशाराही आहे.
आता वैज्ञानिकांचे पुढील लक्ष्य 2026 मध्ये होणारा PLATO अवकाश मोहिमेचा प्रक्षेपण आहे. या मोहिमेतून त्यांना रेड जायंट अवस्थेच्या अधिक विकसित टप्प्यातील तार्यांचा अभ्यास करता येईल. म्हणजे निकट भविष्यात तारे त्यांच्या ग्रहांना कसे आणि कोणत्या क्रमाने संपवतात याची संपूर्ण कहाणी समोर येणार आहे.
