कराचीतील एक थरारक अनुभव
पाकिस्तानच्या कराची शहरातील ‘मौज’ या थिएटर ग्रुपने हा हृदयस्पर्शी आणि मोठा निर्णय घेतला. योगेश्वर करेरा यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले. करेरा म्हणाले, रामायणने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. ही फक्त एका धर्माची कथा नाही. तर ती चांगल्याच्या विजयाची आणि प्रेमाच्या शक्तीची गोष्ट आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, ही कथा रंगमंचावर सादर करताना त्यांना कधीच कोणाच्या नाराज होण्याची भीती वाटली नाही.
advertisement
रामायणचं रंगमंचावर आगमन कसं झालं खास?
हे नाटक प्रथम नोव्हेंबर 2023 मध्ये कराचीतील The Second Floor (T2F) येथे सादर करण्यात आले होते. यावर्षी जुलै 2024 मध्ये हे नाटक Pakistan Art Council मध्ये अधिक मोठ्या स्तरावर सादर करण्यात आले. नाटकात काहीही भव्य किंवा अतिशय महागडं नसलं तरी प्रत्येक प्रसंगात खोल भावनिक परिणाम होता. सादगीतच याचं सौंदर्य लपलेलं होतं.
AI वापरून साकारली रामायणाची दुनिया
या नाटकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे AI (Artificial Intelligence) चा वापर. मंचावरील लाईटिंग, लाईव्ह म्युझिक, रंगीबेरंगी वेशभूषा यांसोबतच AI चा वापर करून असं वातावरण निर्माण करण्यात आलं की, प्रेक्षक रामायणाच्या काळात असल्याचा भास झाला. झाडांच्या पानांची हालचाल, राजाचा भव्य महाल, दृश्यानुसार सतत बदलणारा सेट – हे सगळं AI द्वारे साकारण्यात आलं. नाटकात प्रत्यक्ष झाडं किंवा महाल नव्हते. पण ते इतके खरे वाटत होते की, क्षणभरासाठी सगळं वास्तव वाटू लागलं.
जादू प्रेक्षकांच्या मनात उतरली
‘सीता’ची भूमिका राना काझमी यांनी साकारली आणि त्यांच्या शांततेत, सामर्थ्यात आणि भावनिकतेत प्रेक्षक गुंतून गेले. ‘राम’ साकारणारे अश्मल लालवानी यांच्या गंभीर अभिनयाने उपस्थितांचं मन जिंकलं. रावणची भूमिका सम्हान गाझी यांनी केली आणि त्यांचा रोखठोक आवाज, रागीटपणा, आणि अष्टपैलू शैलीमुळे प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने रावणाला अनुभवले.
राजा दशरथ (आमिर अली), लक्ष्मण (वकास अख्तर), हनुमान (जिब्रान खान) आणि राणी कैकेयी (सना तोहा) यांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या.
टाळ्या वाजवत राहिला कराची, डोळे झाले पाणावले
नाटक संपताच संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमून गेला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. काही प्रेक्षकांना विश्वासच बसत नव्हता की, त्यांनी पाकिस्तानमध्ये एवढ्या प्रेमाने ‘रामायण’ पाहिलं.
राणा काझमी यांचं मत
राणा काझमी यांनी सांगितलं, जेव्हा आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. तेव्हा त्याचा चांगल्या पद्धतीने वापर का करू नये? आम्हाला प्रत्येक दृश्य जिवंत करायचं होतं आणि AI मुळे ते शक्य झालं.
एक संदेश जो सीमारेषा ओलांडतो
या अनुभवाने हे स्पष्ट केलं की, कला कधीही धर्म किंवा राष्ट्र पाहत नाही. ती मानवतेची गोष्ट सांगते. कराचीतील या रामायण सादरीकरणाने सर्व सीमारेषा मिटवून दिल्या आणि प्रेम, श्रद्धा व सर्जनशीलतेचा एक जीवंत अनुभव प्रेक्षकांना दिला.
