होनोलुलु, हवाई: प्रशांत महासागरातून उठलेल्या 'किको' या हरिकेन (चक्रीवादळ) मुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 'किको' पुन्हा एकदा वेगवान होऊन 'कॅटेगरी-4' मधील धोकादायक वादळ बनले आहे. येत्या काही दिवसांत याचा परिणाम हवाई बेटांवर होण्याची शक्यता आहे.
advertisement
हवामान केंद्राच्या माहितीनुसार 'किको' वादळाचा वेग ताशी २१५ किलोमीटर (ताशी १३० मैल) असून शुक्रवारी रात्रीपर्यंत ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता आहे. हे वादळ सध्या हिलो येथे असून ते हवाईपासून १,९२५ किलोमीटर पूर्व-आग्नेय दिशेला आहे. त्याचा वेग ताशी १७ किलोमीटर इतका असून ते पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे.
हवामानशास्त्रज्ञांच्या मते विवारपासून हवाईच्या काही भागांत उंच लाटा आणि धोकादायक रिप करंट्स दिसून येऊ शकतात. अद्याप कोणत्याही बेटासाठी थेट इशारा जारी केलेली नसली तरी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मेक्सिकोमध्ये 'लोरेना'चा कहर
दुसरीकडे पोस्ट-ट्रॉपिकल सायक्लोन 'लोरेना'ने मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्निया द्वीपकल्पात जोरदार पाऊस पाडला आहे. शुक्रवारपर्यंत 'लोरेना'चा वेग कमी होऊन ताशी ५६ किलोमीटर (ताशी ३५ मैल) झाला होता. हे वादळ काबो सॅन लाजारोपासून सुमारे २७५ किलोमीटर पश्चिमेस स्थिर होते.
हवामान विभागाने सांगितले की 'लोरेना' हळूहळू कमकुवत होऊन रविवारी संपुष्टात येईल. परंतु तोपर्यंत बाजा कॅलिफोर्निया सुर, बाजा कॅलिफोर्निया, सोनोरा आणि सिनालोआ या राज्यांमध्ये ३० सेंटीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो. या भागांमध्ये अचानक पूर (फ्लॅश फ्लडिंग) आणि भूस्खलनाचा धोका कायम आहे.
अमेरिकेवर परिणाम
'लोरेना'चा परिणाम ॲरिझोना आणि न्यू मेक्सिकोपर्यंत पोहोचला असून, तिथे १० सेंटीमीटरपर्यंत पाऊस नोंदवला गेला आहे. शनिवारपर्यंत या भागात स्थानिक पूर येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की- 'किको' सारखी वादळे 'कॅटेगरी-3' किंवा त्याहून अधिक शक्तिशाली झाल्यावर त्यांना 'मेजर हरिकेन' मानले जाते. 'किको' या आठवड्याच्या सुरुवातीलाही 'कॅटेगरी-4' पर्यंत पोहोचले होते. शनिवारपासून ते पुन्हा हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे.