महाराष्ट्रातील भारत सरकारच्या मालकीची कंपनी मजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने श्रीलंकेतील सर्वात मोठ्या शिपबिल्डिंग कंपनी ‘कोलंबो डॉकयार्ड पीएलसी’मध्ये मोठी भागीदारी खरेदी केली आहे. ही डील 52.96 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 452 कोटी रुपयांमध्ये पार पडली आहे. MDL ने देशाबाहेरील एखाद्या कंपनीमध्ये पहिल्यांदाच हिस्सेदारी घेतली आहे. भारताच्या सागरी धोरणात हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
advertisement
कोलंबो डॉकयार्ड ही केवळ श्रीलंकेतील सर्वात मोठी जहाजबांधणी कंपनी नाही. तर हिंद महासागरातील सर्वाधिक गजबजलेल्या शिपिंग मार्गाच्या अतिशय जवळ स्थित आहे. हेच ते क्षेत्र आहे जिथे चीनची गुप्तचर जहाजे वारंवार फिरत असतात आणि भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करतात.
गेल्याच महिन्यात चीनचं संशयास्पद ‘रिसर्च शिप’ Da Yang Yi Hao श्रीलंकेच्या दिशेने जाताना दिसले होते. चीन याला रिसर्च शिप म्हणतो, पण तज्ज्ञांचं मत आहे की ही जहाजं प्रत्यक्षात चीनी गुप्तचर यंत्रणेची हत्यारं आहेत. जी समुद्रातील भारताच्या हालचालींवर नजर ठेवतात. हे चीनने त्या वेळेस केलं होतं जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत कोलंबो डॉकयार्ड भारताच्या ताब्यात गेल्यामुळे चीनच्या प्रभावाला मर्यादा येईल. तसेच भारताला सागरी सुरक्षा आणि व्यापारधोरणात एक नवे बळ मिळेल.
जपान गेला, भारत आला
या शिपयार्डमध्ये यापूर्वी जपानच्या ओनोमिची डॉकयार्ड कंपनीची 51% हिस्सेदारी होती. मात्र श्रीलंकेच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे जपानने माघार घेतली. ही संधी भारताने दवडली नाही आणि सरकारच्या पुढाकाराने MDL ने अधिग्रहणासाठी पुढाकार घेतला. आता MDL या यार्डमध्ये नव्या गुंतवणुकीसह भारतीय ऑर्डर्स येथे स्थानांतरित करेल आणि श्रीलंकेत नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करेल. कंपनीचे प्रमुख कॅप्टन जगमोहन म्हणाले, हा निर्णय आम्हाला दक्षिण आशियामध्ये एक जागतिक दर्जाचा शिपयार्ड म्हणून उभं करेल.
चीनसाठी का आहे धक्का?
कोलंबो बंदर हे चीनच्या Belt and Road Initiative (BRI) प्रकल्पांचा भाग राहिला आहे आणि हंबनटोटा सारखी बंदरं आधीच चीनी कंपन्यांच्या हातात गेली आहेत. अशा परिस्थितीत भारताचं हे अधिग्रहण चीनच्या ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ धोरणाला मोठा धक्का देणारं ठरतं. ज्याअंतर्गत तो भारताला चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी भारतीय कंपनी MDL आता श्रीलंकेत चीनच्या टोह घेणाऱ्या हालचालींवरही लक्ष ठेवू शकेल.