काठमांडू: नेपाळमधील वाढत्या निदर्शनांदरम्यान उपास्था गिल या भारतीय महिला पर्यटकाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. निदर्शकांनी पोखरामधील उपास्था राहत असलेल्या हॉटेलला आग लावली. ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उपास्था गिल यांनी सांगितले की, मी हॉटेलच्या स्पा सेंटरमध्ये होते. तेव्हा जमाव आत घुसला आणि त्यांनी मला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मी कशीतरी जीव वाचवून पळून गेले.
advertisement
गिल यांच्या म्हणण्यांनुसार त्यांच्या खोलीतील सर्व सामान आणि बॅग आगीत जळून खाक झाल्या. त्या म्हणाल्या, मी इथे व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आले होते. पण हॉटेल पूर्णपणे जळून गेले. माझ्याकडे काहीही उरले नाही. मी फक्त माझा जीव वाचवू शकले.
भारतीय दूतावासाकडे मदतीची याचना
व्हिडिओमध्ये रडताना उपास्था गिल यांनी भारतीय दूतावासाला मदतीची विनंती केली. परिस्थिती खूप वाईट आहे. लोक सगळीकडे आग लावत आहेत. पर्यटकांनाही सोडले जात नाहीये. कृपया आम्हाला वाचवा. आमच्यासोबत अजूनही काही भारतीय इथे अडकले आहेत, अशी विनंती त्यांनी केली.
नेपाळमध्ये निदर्शने का सुरू आहेत?
केपी शर्मा ओली सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळमधील तरुणांचा राग अनावर झाला. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारने ही बंदी मागे घेतली असली तरी आंदोलन आता भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात मोठ्या आंदोलनात बदलले आहे. या दबावामुळे नेपाळच्या पंतप्रधानांनाही राजीनामा द्यावा लागला.
भारताने दिला प्रवास टाळण्याचा सल्ला
नेपाळमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. सध्या 400 पेक्षा जास्त भारतीय नेपाळमध्ये अडकले आहेत. विमानतळ बंद असल्यामुळे अनेक भारतीयांना भारत-नेपाळ सीमेवरून जमिनी मार्गे परत आणण्यात आले आहे. अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने विशेष विमानांची व्यवस्था करण्याची तयारीही केली आहे.