अमेरिका चिंतेत का?
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी ABC न्यूजला सांगितले की हे यूरेनियम फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथील इराणच्या अणुठिकाणांवर अमेरिका बंकर-बस्टर बॉम्बने केलेल्या हल्ल्यांनंतरच गायब झाले. ते म्हणाले की, 90% पर्यंत समृद्ध केल्यास हे युरेनियम अण्वस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाऊ शकते.
ट्रकची हालचाल, उपकरणे हलवली?
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अनेक सूत्रांचा दावा आहे की अमेरिकन हल्ल्याच्या आधीच इराणने हे युरेनियम व उपकरणे गुप्त स्थळी हलवली असावीत. न्यूयॉर्क टाईम्सला इस्रायली अधिकार्यांनी सांगितले की, फोर्डो अणुठिकाणाजवळ हल्ल्यापूर्वी 16 ट्रकांची एक लांब रांग दिसून आली होती. ही साइट डोंगरात खोदून बनवलेली असून मिसाईल हल्ल्यांपासून सुरक्षित मानली जाते.
advertisement
इराणने ‘खेळ’ केला का?
सॅटेलाईट प्रतिमा जरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान दाखवत असल्या तरी हे युरेनियम वाहून नेणारे ट्रक मात्र गायब आहेत. त्यामुळे इराणनेच हे भांडार लपवले असावे, असा स्पष्ट संशय व्यक्त केला जातो आहे.
IAEA ची गंभीर चिंता
IAEAचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपुढे सांगितले की, इजरायलच्या पहिल्या हल्ल्याच्या एक आठवडा आधी हे युरेनियम शेवटचे पाहण्यात आले होते. त्यांनी त्वरित तपासणीची गरज सांगितली. त्यांचा इशारा होता की, सैन्य तणावामुळे ही अत्यावश्यक तपासणी खोळंबते आहे. जे इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून रोखण्याच्या प्रयत्नांना धक्का देऊ शकते.
इराणकडे खरोखर अण्वस्त्र आहेत का?
IAEA प्रमुख ग्रॉसी यांनी युएनला सांगितले की, हे तपासणे महत्त्वाचे आहे की ही समृद्ध युरेनियम सामग्री कुठे वळवली गेली आहे का नाही. इराणने नेहमीच आपला अणुप्रकल्प शांततामूलक उद्दिष्टांकरिता आहे, असे म्हटले आहे. मात्र इजरायलने सतत शंका व्यक्त केली आहे की इराण अण्वस्त्र तयार करत आहे.
इराणची पूर्वीची धमकी
इस्रायली हल्ल्यांपूर्वी, तेहरान ‘नो रिटर्न पॉइंट’वर पोहोचले आहे, असा इस्रायलचा दावा होता. हल्ल्यानंतर इराणने थेट ‘NPT’ मधून बाहेर पडण्याची धमकी दिली. उप परराष्ट्रमंत्री तख्त रवांची यांनी स्पष्टपणे म्हटले होते, कोणालाही आमच्यावर आदेश देण्याचा अधिकार नाही.
अमेरिकेचा गोंधळलेला सूर
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, इस्रायली हल्ल्यानंतर अमेरिकन गुप्तचर संस्था म्हणाली की- इराण अण्वस्त्र तयार करत नाही आणि हे करायला किमान 3 वर्ष लागतील. मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उलट सांगितले की, इराणकडे आवश्यक साहित्य आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे संचालक तुलसी गबार्ड यांनी पूर्वी याला नकार दिला होता. पण नुकताच त्यांनी सांगितले की इराण काही आठवड्यांत अण्वस्त्र तयार करू शकतो.
इराणचे गायब झालेले 400 किलो समृद्ध युरेनियम हा एक जागतिक सुरक्षा धोका बनला आहे. हे युरेनियम कुठे गेले आणि त्याचा वापर अण्वस्त्रासाठी केला जाणार का, याचे उत्तर मिळेपर्यंत अमेरिका आणि संपूर्ण जगाची झोप उडलेली असेल.
