इस्रायलने इराणवरील हल्ल्याला 'ऑपरेशन रायझिंग लायन' असं नाव दिलं आहे. इस्रायली सैन्याने तेहरान आणि नतान्झसारख्या शहरांमधील लष्करी आणि अणु तळांना लक्ष्य केलं. इराणी माध्यमांनी पुष्टी केली की राजधानी तेहरानच्या ईशान्येकडील मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले.
advertisement
इराणी माध्यमांनुसार, इस्रायली हल्ल्यात अनेक उच्च लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ ठार झाले. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) प्रमुख जनरल हुसेन सलामी, खातम अल-अंबिया प्रमुख सरदार रशीद आणि दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञ डॉ. फेरेदून अब्बासी आणि डॉ. तेहरानची यांचा मृत्यू झाला. यामुळे इराणच्या लष्करी आणि वैज्ञानिक नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.
इस्रायलने कुठे हल्ला केला?
आयडीएफ म्हणजेच इस्रायली संरक्षण दलाचा दावा आहे की त्यांनी इराणचा अणुकार्यक्रम आणि लष्करी तळ नष्ट करण्यासाठी हा हल्ला केला. इराणी माध्यमांनुसार, इस्रायलने या युरेनियम सुविधेवर अनेक वेळा हल्ला केला आहे. अहवालात म्हटलं आहे की इस्रायलने नतान्झ अणुस्थळावरही अनेक वेळा हल्ला केला आहे.
इस्रायलचे बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, इस्रायलच्या इतिहासातील हा एक निर्णायक क्षण आहे. आम्ही इराणला अण्वस्त्रं बनवू देणार नाही.
इराणनं म्हटलं भ्याड हल्ला
इराणने या हल्ल्याला भ्याड हल्ला म्हटलं आहे. तसंच इराणला प्रत्युत्तर देण्याची धमकीही दिली आहे. इराणचं म्हणणं आहे की इस्रायलला याची मोठी किंमत मोजावी लागेल. तथापि, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.
