इराण आणि इस्रायलमधील युद्धादरम्यान चीनच्या दोन मोठ्या मालवाहू विमानांच्या हालचालींकडे जगाचे लक्ष लागले आहे. वृत्तानुसार, गेल्या 48 तासांत, दोन चिनी मालवाहू विमानांनी इराणी हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे ट्रॅकिंग सिग्नल बंद केले आहेत. यापैकी एक विमान झेंगझोऊहून लक्झेंबर्गला जाणार होते. परंतु वाटेत अचानक इराणमध्ये उतरले. काही वृत्तांनुसार, ही विमाने लष्करी साहित्य घेऊन इराणमध्ये पोहोचली आहेत. मात्र, याला अधिकृतपणे दुजोरा मिळाला नाही.
advertisement
चीनचा पाठिंबा, अमेरिकेला उघड आव्हान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. इराणने शरणागती पत्करावी असे ट्रम्प यांनी म्हटले. चीनकडून इराणला अशी गुपचूप मदत पाठवणे म्हणजे अमेरिकेला आव्हान देण्यासारखं असल्याचे म्हटले जात आहे. चीनकडून इराणला लष्करी साहित्यासह इतर मदत पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
इराणला चीनचा उघड पाठिंबा!
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात चीनने इराणला पाठिंबा दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले आहे की ते इस्रायलच्या हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहेत आणि इराणच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला पाठिंबा देत आहेत. इस्रायलच्या "ऑपरेशन रायझिंग लायन" बद्दल चीनने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.