वीज केंद्र ठप्प, शहरात अंधार
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संपूर्ण वीज केंद्र जमीनदोस्त झालं असून परिणामी अशदोद शहरात मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी या घटनेची पुष्टी केली आहे. शहरातील अनेक भाग अंधारात बुडाले असून अत्यावश्यक सेवा आणि रुग्णालयांवर याचा मोठा परिणाम झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
कैद झाला क्षण
या हल्ल्याचा थरारक क्षण आणि त्यानंतरच्या परिस्थितीचे दृश्य स्पष्ट दिसत आहेत. फुटेजमध्ये क्षेपणास्त्राच्या धडकेचा आवाज, त्यानंतर निर्माण झालेला धूराचा मोठा लोळ, आणि उद्ध्वस्त झालेलं वीज केंद्र पाहायला मिळतं.
सुरक्षा यंत्रणांची आपत्कालीन मोहीम सुरू
हल्ल्यानंतर इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य आणि विस्फोट न झालेले क्षेपणास्त्र शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणच्या युद्धनीतीतील मोठा टप्पा
हा हल्ला केवळ एक सामरिक कृती नसून इस्रायलच्या नागरी सुविधांवर थेट घाव घालण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशदोद हे इस्रायलमधील एक महत्त्वाचं व्यापारी बंदर असून तिथे वीज केंद्रावर झालेला हा हल्ला इस्रायलच्या नागरी जीवनावर आणि औद्योगिक गतीवर मोठा परिणाम करू शकतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध थांबवण्याचे आवाहन असतानाही. ईराणने अनेक लाटांमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर इस्रायलच्या उत्तर भागात पुन्हा सायरन वाजले.
या क्षेपणास्त्रांच्या सलग स्फोटांदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ डॅशकॅम फुटेज असून त्यामध्ये क्षेपणास्त्र रस्त्याच्या कडेला लागल्यावर दगडधोंडे व माती हवेत उडताना दिसते. त्या क्षणानंतर वाहनाच्या काचा धुळीने भरून गेलेल्या दिसतात आणि ड्रायव्हर क्षेपणास्त्र लागलेल्या ठिकाणाहून वेगाने वाहन नेत असल्याचे पाहायला मिळते.
द टाइम्स ऑफ इस्रायलच्या माहितीनुसार, या हल्ल्यात तात्काळ कोणतीही जखमी किंवा मृत्यूची नोंद नाही. मात्र, देशात इतर काही भागांतही क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले आहेत. इराणकडून जवळपास ४० मिनिटांपर्यंत विविध सल्व्होमध्ये क्षेपणास्त्र डागण्यात आली. जी युद्धाच्या इतिहासातील सर्वाधिक दीर्घकालीन हल्ल्यांपैकी एक मानली जात आहे.
जेरुसलेममध्येही जोरदार स्फोट ऐकायला मिळाले. मात्र मगेन डेव्हिड अडोम (Magen David Adom) या बचाव सेवेनुसार तात्काळ कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात तेहरानने गंभीर नुकसान करण्याची धमकी दिली आहे. इराणचे सशस्त्र दलांचे प्रवक्ते इब्राहिम झोलफाघारी यांनी सरकारी टेलिव्हिजनवर सांगितले की, अमेरिका जे शत्रुत्वाचे कृत्य करत आहे ते इस्रायली बॉम्बहल्ल्यांच्या एक आठवड्यानंतर असून यामुळे या संपूर्ण भागात युद्ध अधिक तीव्र होईल.
