रशियाच्या कामचटकाला भागात पहाटे भूकंपाचे मोठे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.7 इतकी मोजण्यात आली. यूएसजीएसच्या मते, भूकंप समुद्राखाली झाला होता, त्यानंतर जपान आणि अमेरिकन संस्थांनी त्सुनामीचा इशारा दिला आहे. भूकंप समुद्राच्या उथळ भागात झाल्यामुळे त्सुनामी आणि जोरदार भूकंपाचे झटके बसण्याची आणखी शक्यता वाढली आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार जपान हवामान संस्थेने म्हटले आहे की 1 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 नंतर येण्याची शक्यता आहे. या त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे हायअलर्ट जारी केला आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे आणि सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे आणि मदत आणि बचाव कार्याची तयारी सुरू केली आहे. जुलैच्या सुरुवातीला कामचटकाच्या जवळील समुद्रात अनेक भूकंप झाले आहेत, त्यापैकी एकाची तीव्रता 7.4 होती.
पुढील तीन तासांत रशिया आणि जपानच्या काही भागात त्सुनामीच्या लाटा धोकादायक ठरू शकतात. फिलीपिन्स, मार्शल बेटे, पलाऊ आणि इतर बेटांवरही सौम्य लाटा पोहोचण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्यांना त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगितले. भूकंप आणि त्सुनामीच्या धोक्यानंतर, रशियाच्या सखालिन प्रदेशातील सेवेरो-कुरिलस्क या छोट्या शहरातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
