रविवारच्या दिवशी लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर जो काही थरार घडला त्याने अमेरिकेतील अंतर्गत असंतोष संपूर्ण जगासमोर आणला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नेशनल गार्ड’ तैनात केल्यानंतर हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘हायवे 101’ जाम केला आणि अनेक गाड्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले.
विरोधातील झेंडे, घोषणांनी थरथरणारे रस्ते आणि पसरणारी गर्दी... अशा अनेक दृश्यांचा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये निदर्शक अमेरिकेचा झेंडा जाळताना आणि ट्रम्पविरोधात घोषणा देताना दिसत आहेत. काही लोकांनी तर अमेरिकन झेंड्यावर थुंकून आपला रोष व्यक्त केला. निदर्शनादरम्यान सोव्हिएत युनियन आणि मेक्सिकोचा झेंदाही फडकताना दिसला. सोशल मीडिया युजर निक सॉर्टर यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिलं – हे लोक आपल्या देशाचा द्वेष करतात. त्यांना इथे राहू द्यावं का?
advertisement
स्थानिक पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधुराच्या काड्या आणि रबर बुलेट्सचा वापर केला. बंदूकांनी सज्ज पोलिस कर्मचारी प्रत्येक वळणावर तैनात होते. काही ठिकाणी घोडेस्वार पोलीस गस्त घालत होते. निदर्शकांनी पार्कमधून खुर्च्या आणून बॅरिकेड्स उभारले.
जसजसा दिवस चढत गेला, तसतसा संघर्ष वाढत गेला. महामार्गावर पोलिसांवर दगडफेक आणि फटाक्यांचा भडिमार झाला. ज्यामुळे पोलिसांना पूलाखाली लपण्याची वेळ आली.
या संपूर्ण निदर्शनाच्या मुळाशी आहे ट्रम्प सरकारने घेतलेला इमिग्रेशनविषयक कठोर निर्णय. शुक्रवारी फेडरल इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी 44 परप्रांतीयांना ताब्यात घेतले. त्यानंतर लॉस एंजेलिसभर निदर्शनं सुरू झाली. ट्रम्प प्रशासनाने ‘नॅशनल गार्ड’ तैनात केला, ज्यावर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजॉम यांनी राज्याच्या सार्वभौमत्वावर आघात झाल्याचं सांगत आक्षेप घेतला.
न्यूजॉम यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पत्र लिहून सांगितलं की सैन्याची उपस्थिती परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक भडकावत आहे. यावर ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की डेमोक्रॅट नेत्यांच्या अपयशामुळे ही स्थिती निर्माण झाली असून ‘नॅशनल गार्ड’ची तैनाती अत्यावश्यक आहे.
हिंसाचार इतका तीव्र होता की किमान चार सेल्फ ड्रायव्हिंग गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या. आकाशात काळा धुर दिसत होता आणि इलेक्ट्रिक बॅटरी फुटल्यामुळे मोठमोठे आवाज येऊ लागले.
पोलिसांनी अनेक ब्लॉक्स बंद केले आणि ‘फ्लॅश बँग’ ग्रेनेड्सचा वापर करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. निदर्शकांनी एका स्ट्रिप मॉलला आग लावली, अनेक दुकाने फोडली आणि सरकारी इमारतींवर तसेच गाड्यांवर स्प्रे पेंटने घोषणाबाजी केली. काही निदर्शकांनी मेक्सिकोचा झेंडा फडकावला आणि “ICE लॉस एंजेलिसमधून बाहेर जा” असे नारे दिले.
दरम्यान, एफबीआयने संशयितांची ओळख पटवण्यासाठी, अटक आणि शिक्षा मिळवून देण्यासाठी माहिती देणाऱ्यास 50,000 डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी ट्रम्प यांची पोस्ट ‘X’ वर शेअर करत म्हटलं – या क्षणी निर्णायक नेतृत्वाची गरज आहे. राष्ट्राध्यक्ष दंगल आणि हिंसा सहन करणार नाहीत.
