तियानजिन: चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तियानजिन शहरात झालेली भेट जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनली आहे. ही भेट केवळ दोन देशांमधील संबंध सुधारण्यापुरती मर्यादित नव्हती तर एक असा महत्त्वाचा राजकीय संदेश होता. ज्यामुळे वॉशिंग्टनमध्येही हालचाल झाली आहे.
advertisement
ड्रॅगन आणि हत्तीचा ‘डान्स’
शी जिनपिंग यांनी सांगितले की- आज जग ‘शंभर वर्षांतून एकदा’ घडणाऱ्या मोठ्या बदलांमधून जात आहे. अशा वेळी चीन आणि भारताने चांगले शेजारी आणि मित्र बनणे हाच योग्य मार्ग आहे. त्यांनी ‘ड्रॅगन आणि हत्तीने एकत्र डान्स केला पाहिजे’ असे म्हटले. याचा स्पष्ट अर्थ होता की जर भारत आणि चीनने एकमेकांना प्रतिस्पर्धी मानण्याऐवजी भागीदार मानले, तर त्यांचे संबंध दीर्घकाळ स्थिर राहतील.
पंतप्रधान मोदींनीही यावर सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की- दोन्ही देशांनी परस्पर आदर, समान हित आणि संवेदनशीलता यावर आधारित मैत्रीची चर्चा केली. या बैठकीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाही सहभाग होता. मोदी, जिनपिंग आणि पुतिन यांच्या या जुगलबंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.
ट्रम्प का अस्वस्थ आहेत?
सीएनएनच्या रिपोर्टनुसार- या तिन्ही नेत्यांची भेट भू-राजकीय (geopolitical) दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर अलीकडेच कठोर आर्थिक निर्बंध लावले आहेत. ज्यामुळे दिल्ली आणि वॉशिंग्टनच्या संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. दुसरीकडे भारत आणि चीन दोन्ही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहेत. अमेरिका याला युक्रेन युद्धात रशियाला मदत मानतो. म्हणूनच तियानजिनमधील ही मोदी-जिनपिंग भेट वॉशिंग्टनमध्ये काळजीपूर्वक पाहिली जात आहे.
‘बहुध्रुवीय जगा’ची (Multipolar World) गरज
शी जिनपिंग यांनी मोदींना सांगितले की- चीन आणि भारत विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत आणि त्यांनी विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार- शी जिनपिंग यांनी असेही म्हटले की, दोन्ही देशांनी मिळून जगाला ‘बहुध्रुवीय’ बनवण्यासाठी काम केले पाहिजे. म्हणजेच असे जग जिथे केवळ अमेरिका आणि त्यांचे सहयोगी देशांचे वर्चस्व नसेल.
पंतप्रधान मोदींनीही विश्वास आणि सहकार्याची ग्वाही दिली. त्यांनी म्हटले की, भारत परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित चीनसोबत संबंध पुढे नेण्यास कटिबद्ध आहे आणि आपल्या २.८ अब्ज लोकांचे भविष्य या भागीदारीवर अवलंबून आहे.
ग्लोबल साउथचा नवा मंच
या SCO परिषदेमध्ये केवळ मोदी, जिनपिंग आणि पुतिनच नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान हेदेखील सहभागी होते. हे दर्शवते की चीन या व्यासपीठाला ‘ग्लोबल साउथ’ (विकसनशील देश) च्या एकीकरणाचा मंच म्हणून सादर करू इच्छित आहे.
विशेषज्ञांच्या मते हे असे देश आहेत जे अमेरिकेमुळे नाराज आहेत. चीन या सर्वांना एकत्र आणून हे दाखवू इच्छित आहे की, जागतिक शासन आणि व्यवस्थेसाठी त्यांची एक वेगळी दृष्टी आहे.
अमेरिकाविरोधी संकेत?
जर भारताने परिषदेच्या अंतिम घोषणेवर स्वाक्षरी केली आणि त्यात जागतिक व्यापार युद्धाचा उल्लेख असेल, तर हा अमेरिकेसाठी मोठा धक्का ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते जर भारताने या विधानाला पाठिंबा दिला. तर याचा अर्थ स्पष्ट होईल की, नवी दिल्ली वॉशिंग्टनऐवजी बीजिंग आणि मॉस्कोच्या जवळ उभे आहे.
SCO जगाचे संतुलन बदलू शकते का?
शी जिनपिंग या परिषदेत पुढील 10 वर्षांसाठीची SCO विकास रणनीती सादर करणार आहेत. ते चीनला आशिया-युरेशियामध्ये एक मुख्य ‘डिझायनर’ म्हणून सादर करू इच्छित आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, हा केवळ एक सामान्य कार्यक्रम नाही. तर चीनची वाढती ताकद आणि इरादा दर्शवणारा एक महत्त्वाचा सोहळा आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा अमेरिका आणि चीनमधील स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. तेव्हा SCO जगाचे संतुलन बदलण्यासाठी एक मोठे पाऊल ठरू शकते.
