वॉशिंग्टन: खगोलशास्त्रामध्ये नेहमीच एक मोठा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे पृथ्वीबाहेरही कुठे जीवन आहे का? या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने नासाने बुधवारी एक ऐतिहासिक खुलासा केला आहे. अमेरिकेच्या या अंतराळ संस्थेने सांगितले की, त्यांच्या ‘पर्सीवरन्स’ (Perseverance) रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावरील एका खडकावर ‘संभाव्य बायोसिग्नेचर’ (जीवनाचे संकेत) शोधले आहेत.
advertisement
शास्त्रज्ञांनी या खडकाला ‘चेयावा फॉल्स’ (Cheyaw Falls) असे नाव दिले आहे. हा खडक 2024 मध्ये रोव्हरच्या वाटेत आला होता. रोव्हरने आपल्या सेन्सर आणि उपकरणांच्या मदतीने त्याचे विश्लेषण केले. त्यात माती, गाळ (silt), सेंद्रिय कार्बन, सल्फर, फॉस्फरस आणि ऑक्सिडाइज्ड आयर्न (गंज) असल्याचे आढळले. पृथ्वीवर याच घटकांना कोट्यवधी वर्षांपूर्वी सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा पुरावा मानले जाते.
नासाने सांगितले की, या खनिजांचे मिश्रण इलेक्ट्रॉन-ट्रान्सफर रिॲक्शनमुळे झाले असावे. सूक्ष्मजीव ऊर्जा मिळवण्यासाठी ज्या प्रकारे प्रक्रिया करतात, त्यासारखीच ही प्रक्रिया आहे. मात्र शास्त्रज्ञांनी हे देखील स्पष्ट केले की ही रचना गैर-जैविक प्रक्रियांमुळेही तयार होऊ शकते. म्हणजेच चित्र अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा
नासाचे कार्यवाहक प्रशासक सीन डफी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की- हा शोध मंगळावर जीवनाचा शोध घेण्याच्या सर्वात जवळचा आहे. यामुळे आमच्या संशोधनाला एक नवीन दिशा मिळेल. ‘पर्सीवरन्स’ने आतापर्यंत 30 पेक्षा जास्त नमुने गोळा केले आहेत. हे नमुने पृथ्वीवर आणून प्रगत प्रयोगशाळांमध्ये त्यांची तपासणी करण्याची योजना आहे. त्यानंतरच मंगळावर कधीतरी जीवन होते की नाही हे निश्चितपणे सांगता येईल.
नमुने पृथ्वीवर आणणे मोठे आव्हान
नासाचे ‘मार्स सॅम्पल रिटर्न’ (MSR) मिशन सुरुवातीपासूनच वाद आणि विलंबात अडकलेले आहे. सुरुवातीला 2023 पर्यंत नमुने पृथ्वीवर येतील असा अंदाज होता. पण त्याची किंमत ११ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आणि मुदत 2040 पर्यंत वाढली.
2024 मध्ये नासाने आपली रणनीती बदलली. आता दोन पर्याय समोर आहेत: एक तर नासा स्वतः स्काय-क्रेनद्वारे लँडर पाठवेल किंवा कोणत्याही खाजगी कंपनीच्या प्रणालीचा वापर करेल. नवीन योजनेमुळे २०२५ पर्यंत नमुने पृथ्वीवर आणण्याची आशा आहे. पण ट्रम्प प्रशासनाच्या अलीकडील बजेट कपातीमुळे या मिशनवर संकट आले आहे. नासाचे विज्ञान बजेट जवळपास अर्धे केले गेले आहे. ज्यामुळे MSR सह अनेक मिशन रद्द होण्याच्या धोक्यात आहेत.
मंगळावर मानवी वस्तीचे स्वप्न साकार होणार का?
जर या नमुन्यांमध्ये खरोखरच जीवनाचे संकेत मिळाले, तर तो मानवी इतिहासातील सर्वात मोठा वैज्ञानिक खुलासा असेल. याचा अर्थ असा की- विश्वात जीवन फक्त पृथ्वीपुरतेच मर्यादित नाही. तसेच भविष्यात माणूस मंगळावर राहू शकतो का? याचाही विचार होऊ शकतो.
सध्या मंगळावर वातावरण खूप विरळ आहे. तापमान खूप थंड आहे आणि ऑक्सिजन नाही. पण जीवनाचे संकेत या गोष्टीचा पुरावा असू शकतात की, अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळ पृथ्वीसारखाच होता. म्हणूनच शास्त्रज्ञ मानतात की मंगळावर मानवी वस्तीचे स्वप्न आता पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले आहे.