निक्की हेली यांनी 'X' वर लिहिले, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये. परंतु चीन जो आपला प्रतिस्पर्धी आहे आणि रशिया व इराणकडून सर्वात जास्त तेल खरेदी करतो त्याला 90 दिवसांची टॅरिफ सूट मिळाली आहे. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 24 तासांत मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर हेली यांची ही कठोर प्रतिक्रिया आली आहे.
advertisement
एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिका भारतासोबत खूप कमी व्यापार करतो. तर भारत आमच्यासोबत खूप जास्त व्यापार करतो. ट्रम्प यांनी असाही आरोप केला होता की, भारत मोठ्या प्रमाणावर रशियन तेल खरेदी करत आहे आणि नंतर ते खुल्या बाजारात नफ्यासाठी विकत आहे.
चीनला का वाचवत आहात?
भारत अधिक शक्तिशाली व्हावा यासाठी सर्वात मोठी समर्थक मानल्या जाणाऱ्या निक्की हेली म्हणाल्या, चीनला सूट देणे आणि भारतासारख्या विश्वासू सहकाऱ्याशी संघर्ष करणे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणासाठी आत्मघाती ठरू शकते. ही वेळ भारताला सोबत घेण्याची आहे, त्याला दूर करण्याची नाही. तुम्ही चीनला का वाचवत आहात?
भारताने दिले सडेतोड उत्तर
ट्रम्प यांच्या आरोपांनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले. मंत्रालयाने म्हटले, आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत आहोत. कारण ते आमच्या लोकांसाठी आवश्यक आहे. जे आम्हाला तेल देत होते, ते युरोपकडे वळले आहेत. त्यावेळी अमेरिकेने स्वतः आम्हाला बाजारात संतुलन राखण्यासाठी रशियाकडून तेल आयात करण्यास प्रोत्साहन दिले होते. भारताने स्पष्टपणे सांगितले की- अमेरिकाही रशियासोबत व्यापार करत आहे आणि युरोपीय देशही व्यापार करत आहेत. त्यामुळे फक्त भारतावर आरोप करणे तर्कहीन आहे. भारत, एक मोठी अर्थव्यवस्था असल्यामुळे आपल्या राष्ट्रीय हितासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलेल.
