स्टॉकहोम: गेल्या 4 दिवसांपासून विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीद्वारे उद्या 10 ऑक्टोबर रोजी शांततेचा नोबेल जाहीर होणार आहे. या वर्षाचा शांततेचा नोबेल चर्चा येण्याचे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पुरस्कारावर केलेला दावा होय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांना या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का? हा प्रश्न सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रम्प स्वतःला शांततेचा दूत” म्हणवतात आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संघर्ष संपविल्याचा दावा केला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते या वर्षी त्यांना नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता अत्यल्प आहे.
advertisement
ट्रम्पचे दावे, पण नोबेलपासून दूर
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षीय काळात अनेक वेळा दावा केला होता की त्यांनी जगातील आठ मोठे संघर्ष संपविले आहेत. इतकंच नाही भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचे त्यांनी 50 पेक्षा अधिक वेळा दावे केले होते. मात्र भारत सरकारने हे सर्व दावे वेळोवेळी नाकारले.
या संदर्भात स्वीडनचे आंतरराष्ट्रीय विषय तज्ज्ञ प्राध्यापक पीटर वॉलेनस्टीन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की- नाही या वर्षी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही. कदाचित पुढील वर्षी? तोपर्यंत त्यांच्या उपक्रमांवरील वादळ आणि धूळ शांत होईल, जसे गाझा संकटाबाबत झाले.
मग या वर्षीचा विजेता कोण असू शकतो?
जेव्हा हे स्पष्ट झाले आहे की ट्रम्प या वेळी विजेत्यांच्या यादीत नाहीत, तेव्हा आता सर्वांच्या नजरा या प्रश्नाकडे वळल्या आहेत, जर ट्रम्प नाही, तर मग नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळणार?
या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार शुक्रवार भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता नॉर्वेच्या ओस्लो येथे घोषित केला जाणार आहे. या वेळी एकूण 338 व्यक्ती आणि संस्थांचे नामांकन झाले आहे. मात्र नोबेल समितीची परंपरा अशी आहे की नामांकितांची अधिकृत यादी 50 वर्षे गोपनीय ठेवली जाते.
2024 मध्ये हा पुरस्कार जपानच्या “निहोन हिदानक्यो” (Nihon Hidankyo) संस्थेला देण्यात आला होता. ही संस्था हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यातून वाचलेल्या पीडितांचा आवाज जगापर्यंत पोहोचवते.
जगभरातील संघर्षांनी केलेलं समीकरण कठीण
तज्ज्ञांच्या मते 2025 च्या शांतता पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया अत्यंत कठीण ठरणार आहे. कारण जगातील परिस्थिती सध्या अतिशय तणावपूर्ण आहे.
इस्रायल–इराण यांच्यात थेट संघर्ष
गाझा पट्ट्यातील युद्ध
भारत–पाकिस्तान दरम्यान ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले
थायलंड–कंबोडिया सीमावाद
या सर्व घटनांमुळे जागतिक शांततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्वीडनच्या उप्साला विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये विक्रमी प्रमाणात राज्य-स्तरीय युद्धे झाली आहेत.
2025 साठीच्या चर्चेत असलेली प्रमुख नावे
या वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी काही प्रभावी नावे आघाडीवर आहेत:
सूडानची “इमर्जन्सी रिस्पॉन्स रूम्स” (Emergency Response Rooms) — युद्धग्रस्त भागात जीव धोक्यात घालून लोकांना मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची संघटना.
रशियातील विरोधी नेते अलेक्सी नवलनी यांची पत्नी यूलिया नवलनाया (Yulia Navalnaya) — आपल्या पतीच्या वारशाला आणि लोकशाहीच्या लढ्याला जागतिक स्तरावर पुढे नेणाऱ्या महिला.
ऑफिस फॉर डेमोक्रॅटिक इन्स्टिट्युशन्स अँड ह्युमन राईट्स (ODIHR) — जगभरातील निवडणुका निरीक्षण करणारी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारी संस्था.
संयुक्त राष्ट्रसंस्थाही रेसमध्ये
काही तज्ज्ञांच्या मते या वर्षी नोबेल समिती जागतिक सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या समर्थनाचा संदेश द्यायची शक्यता आहे. विशेषतः त्या नेत्यांविरुद्ध जे या व्यवस्थेला आव्हान देतात, जसे की डोनाल्ड ट्रम्प. या पार्श्वभूमीवर यूएन महासचिव अँटोनियो गुटेरेस, यूएनएचसीआर (शरणार्थी विषयक संस्था) आणि यूएनआरडब्ल्यूए (फलस्तीनी शरणार्थींसाठी संयुक्त राष्ट्र संस्था) या तीन संस्थांची नावेही प्रबळ स्पर्धकांमध्ये घेतली जात आहेत.
जागतिक न्याय आणि माध्यम स्वातंत्र्य संस्थाही चर्चेत
दुसऱ्या मतानुसार यावर्षी जागतिक न्याय आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संस्थांना सन्मान मिळू शकतो. त्यात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC),इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (ICJ),कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्स (CPJ), रिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्स (RSF) या संस्थांचा समावेश आहे.
नोबेल समितीचा आश्चर्याचा डाव?
इतिहास सांगतो की नोबेल समिती अनेकदा अनपेक्षित निर्णय घेते. कधी कधी असा व्यक्ती किंवा संस्था विजेता ठरते, ज्याचं नाव कुणीही अपेक्षित केलं नसतं. म्हणूनच या वर्षीही कोणीतरी आश्चर्यकारक विजेता समोर येऊ शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही. भले ते स्वतःला कितीही पात्र समजत असले तरीही.