कराची: पाकिस्तानचे माजी खासदार आणि जमीयत उलेमा-ए-इस्लाम (F) चे प्रमुख फजल-उर-रहमान यांनी रविवारी एका सभेत जोरदार आरोप करत म्हटले की, पाकिस्तानची सेना देशाची सतत अब्रू घालत आहे. त्यांनी 1971 च्या युद्धाचा संदर्भ देत सांगितले की पाकिस्तानच्या लष्कराने एका हिंदू (भारतीय) जनरलसमोर तब्बल 90 हजार सैनिकांसह शरणागती पत्करली आणि त्या दिवसापासून पाकिस्तानची इज्जत मातीमध्ये गेली. रहमान यांच्या मते, पाकिस्तानने जगासमोर आपला चेहरा त्या दिवशीच “जाळला” होता.
advertisement
फजल-उर-रहमान म्हणाले की, त्या लाजिरवाण्या पराभवातून पाकिस्तान आजतागायत सावरलेले नाही, कारण त्याच मानसिकतेचे निर्णय आणि धोरणे आजही कायम आहेत. त्यांच्या मते, सेना आपली चूक कधीच स्वीकारत नाही, सत्य जनता पर्यंत पोहोचू देत नाही आणि उलट राजकीय नेत्यांवर दबाव टाकते. देशातील ढासळलेली अर्थव्यवस्था, प्रचंड महागाई आणि वाढती बेरोजगारीही सेनेच्या अपयशी आणि चुकीच्या धोरणांचे थेट परिणाम आहेत, असा त्यांचा ठाम आरोप आहे.
रहमान पुढे म्हणाले की, जे लोक देशाला या दयनीय परिस्थितीत घेऊन आले, तेच आता स्वतःला “हीरो” म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता सर्व जाणते आणि तिला फसवणे आता शक्य नाही. फजल-उर-रहमान पाकिस्तानच्या सत्ताधारी वर्ग आणि लष्करी प्रतिष्ठानचे कडवे टीकाकार आहेत. ते अनेकवेळा खासदार राहिले असून इम्रान खान यांचे ते कठोर विरोधक मानले जातात. 2019 मध्ये त्यांनी इम्रान सरकारविरुद्ध “आझादी मार्च” आयोजित करत मोठे आंदोलनही केले होते.
