पॅरिस : फ्रान्सच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. देशाचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी फक्त २७ दिवसांतच राजीनामा दिला आहे. त्यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. परंतु ६ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांच्याकडे सादर केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा तत्काळ स्वीकारला आहे.
advertisement
लेकोर्नू यांनी फक्त एक दिवस आधी म्हणजेच रविवारी आपल्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली होती. पण त्या घोषणेच्या अवघ्या १२ तासांनंतरच त्यांनी राजीनामा देऊन संपूर्ण फ्रान्सला आणि जगभरातील राजकीय निरीक्षकांना धक्का दिला. फक्त १३ महिन्यांच्या कालावधीत हा फ्रान्सचा चौथा पंतप्रधान बदल ठरला आहे. याआधीचे पंतप्रधान फ्रान्स्वा बायरो यांनी विश्वासमत न मिळाल्यामुळे सप्टेंबरमध्येच राजीनामा दिला होता.
सेबॅस्टियन लेकोर्नू हे केवळ ३९ वर्षांचे आहेत आणि ते राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. ते मॅक्रों यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पाचवे पंतप्रधान ठरले होते. तर मागील वर्षी संसद बरखास्त झाल्यानंतर नियुक्त झालेले तिसरे पंतप्रधान होते.
लेकोर्नू यांच्या राजीनाम्यामुळे फ्रान्समधील राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरता आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देशाच्या संसदेतील कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आणि हाच राजकीय गोंधळ या संकटाला कारणीभूत ठरला आहे. या परिस्थितीत विरोधी पक्षांनी पुन्हा नव्या निवडणुकांची मागणी सुरू केली आहे.
दक्षिणपंथी नेत्या मरीन ले पेन यांनी सर्वप्रथम या मुद्द्यावर सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं, सध्याची परिस्थिती हाताळणे मॅक्रों यांच्या नियंत्रणाबाहेर गेलं आहे. आता त्यांचा राजीनामा देणंच योग्य ठरेल. त्याचबरोबर अनेक विरोधी नेत्यांनीही संसद बरखास्त करून नव्या संसदीय निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मात्र राष्ट्रपती मॅक्रों यांनी या मागणीला सरळ नकार दिला असून त्यांनी स्वतःचा राजीनामा देण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
राजीनाम्याचं मूळ कारण लेकोर्नू यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या रचनेवरून निर्माण झालेली नाराजी असल्याचं समोर आलं आहे. मॅक्रों यांचा सहयोगी पक्ष “लेस रिपब्लिकन्स” यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं की- या कॅबिनेटमध्ये काहीही नवीन नाही. हे जुन्या चेहऱ्यांचं पुनरागमन आहे. लेकोर्नू यांनी मात्र याआधी “नवीन सुरुवात” करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या कॅबिनेटच्या घोषणेनंतर टीका आणखी तीव्र झाली.
रविवारच्या संध्याकाळी झालेल्या कॅबिनेट घोषणेनंतर जवळजवळ सर्व राजकीय पक्षांनी यावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वात मोठा वाद तेव्हा झाला. जेव्हा ब्रुनो ले मायेर जे मागील सात वर्षांपासून मॅक्रों सरकारमध्ये अर्थमंत्री होत; त्यांना नव्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री बनवण्यात आलं. या बदलावरून सरकारवर स्वतःचा गट वाचवण्यासाठी राजकीय पुनर्वापर केल्याचा आरोप झाला.