या हल्ल्यांत तीन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह किमान चार जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कीवमधील मेट्रो सेवा पूर्णतः ठप्प झाली असून अनेक निवासी इमारतींना आग लागली आहे. कीवच्या सोलोमिंस्की जिल्ह्यातील एक निवासी इमारत पूर्णतः उद्ध्वस्त झाली तर डार्नित्स्की आणि पश्चिमी जिल्ह्यातही आगीचे प्रकार घडले. स्थानिक प्रशासनानुसार मेट्रो स्टेशनदरम्यान चाललेली एक ट्रेन देखील हल्ल्याची शिकार झाली.
advertisement
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सहकारी देशांना आवाहन करत सांगितले की, जर जग निर्णायक पावले उचलणार नसेल तर तेही या युद्धाचे भागीदार ठरतील. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्यांना युक्रेनच्या दहशतवादी कृतींना दिलेला प्रतिसाद असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी युक्रेनने ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ अंतर्गत रशियाच्या 41 बॉम्बवर्षक विमानांचे नुकसान केल्याचा दावा केला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाल्याचे बोलले जात आहे.
इतर शहरांमध्येही स्थिती गंभीर आहे. टेरनोपिल येथे 10 लोक जखमी झाले असून त्यात पाच आपत्कालीन सेवा कर्मचारी आहेत. पोल्टावा आणि खमेलनित्सकीमध्ये इमारती आणि कॅफेंवर हल्ले झाले. ल्वीवमध्ये युक्रेनच्या एअर डिफेन्सने तीन रशियन क्षेपणास्त्रांना पाडले.
युक्रेनच्या मानवाधिकार आयोगाने रशियाला 'दहशतवादी राष्ट्र' म्हणून जाहीर करत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.