कीव्ह: युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियाने केलेल्या ताज्या हल्ल्यात युक्रेनच्या प्रशासकीय इमारतीच्या छताला आग लागली, अशी माहिती कीव्हमधील लष्करी प्रशासनाचे प्रमुख तिमार टकाचेन्को यांनी दिली. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार युक्रेन सरकारच्या मुख्य इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडताना दिसले.
advertisement
एका शत्रूच्या हल्ल्यात सरकारी इमारतीचे, छताचे आणि वरील मजल्यांचे नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे युक्रेनच्या पंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांनी फेसबुकवर म्हटले आहे.
दरम्यान युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर देत रशियाच्या ब्रायनस्क प्रदेशातील द्रुझबा तेल पाइपलाइनवर हल्ला केला. ज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी माहिती युक्रेनच्या ड्रोन दलाचे कमांडर रॉबर्ट ब्रोव्हडी यांनी दिली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की- रशियाने 800 हून अधिक ड्रोन आणि 13 क्षेपणास्त्रे डागली. एक्स वर त्यांनी म्हटले, गेल्या रात्रीपासून रशियन हल्ल्यांचे परिणाम दूर करण्याचे काम सुरू आहे. 800 हून अधिक ड्रोन आणि 13 क्षेपणास्त्रे, ज्यात ४ बॅलेस्टिकचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार काही ड्रोन युक्रेन आणि बेलारूसच्या सीमेपलीकडे गेले आहेत.
या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. ज्यात एका लहान बाळाचाही समावेश आहे. 18 लोक जखमी झाले. राजधानीतील अनेक इमारतींना आग लागली. ज्यात सरकारी इमारतीचाही समावेश आहे. कीव्हचे महापौर विटाली क्लित्श्को यांनी सांगितले की- ड्रोन हल्ल्याने सुरुवात झाली आणि त्यानंतर क्षेपणास्त्रांचा मारा झाला. ज्यात सरकारी इमारतीला आग लागली.
रशियन हल्ल्यामुळे एका निवासी इमारतीच्या चारपैकी दोन मजल्यांना आग लागली. स्वेतशिन्स्कीच्या पश्चिम जिल्ह्यात एका नऊ मजली इमारतीचे काही मजले अंशतः उद्ध्वस्त झाले, असे क्लित्श्को आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितले. आकाशातून पडलेल्या ड्रोनच्या अवशेषांमुळे १६ मजली आणि दोन नऊ मजली इमारतींना आग लागली, असे महापौर म्हणाले.
रशिया जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सरपणे नागरी लक्ष्यांवर हल्ला करत आहे. मध्य युक्रेनमधील क्रेमेनचुक शहरात डझनांनी स्फोट झाले. ज्यामुळे काही भागांतील वीज पुरवठा खंडित झाला, असे महापौर विटाली मालेत्स्की यांनी टेलिग्रामवर सांगितले. त्याच प्रदेशात क्रिवी रीहवरील रशियन हल्ल्यांमुळे वाहतूक आणि शहराच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले, असे स्थानिक लष्करी प्रमुख ओलेक्सांद्र विल्कूल यांनी सांगितले. परंतु यात कोणालाही दुखापत झाली नाही.