भारत आणि रशियामध्ये विशेष, दीर्घकालीन संबंध आहेत आणि आम्ही या संबंधांना खूप महत्त्व देतो. आमच्यात उच्चस्तरीय संवाद झाला असून अशा संवादांमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या बातमीने आम्हाला खूप आनंद झाला आहे. माझ्या माहितीनुसार दौऱ्याच्या तारखा आता जवळपास निश्चित झाल्या आहेत, असं अजित डोभाल यांनी म्हटलं.
advertisement
दरम्यान पुतिन यांच्या भारत दौऱ्याची ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. व्हाईट हाऊसच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या या आदेशात, भारताकडून रशियन तेलाची सातत्याने खरेदी केली जात असल्याचे कारण म्हणून नमूद केले आहे.
भारत सध्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे रशियन फेडरेशनकडून तेल आयात करत आहे, असं त्या आदेशात नमूद करण्यात आलं असून, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणीबाणीच्या तरतुदींनुसार टॅरिफ वाढवणे गरजेचे आणि योग्य असल्याचं ट्रम्प प्रशासनाने म्हटलं आहे.
हा नवीन टॅरिफ आदेश 21 दिवसांनंतर लागू होणार असून यामुळे भारतीय वस्तूंवर एकूण अमेरिकी कर सुमारे 50 टक्क्यांवर पोहोचणार आहे. ट्रम्प प्रशासनाने कोणत्याही आशियाई देशावर लावलेला हा सर्वात मोठा टॅरिफ आहे.
रशियासाठी अंतिम मुदत
वॉशिंग्टनने असा इशारा दिला आहे की जर रशिया युक्रेनमध्ये युद्ध थांबवण्यासाठी शुक्रवारपर्यंत तयारी दर्शवली नाही, तर रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दुय्यम निर्बंध लावले जातील. हे युद्ध आता चौथ्या वर्षात प्रवेश करत असून, रशिया आणि पश्चिम देशांमध्ये तणावाचे प्रमुख कारण बनले आहे. भारतासारखे काही देश रशियाशी व्यापारिक संबंध कायम ठेवत असल्याने अमेरिका अधिकच आक्रमक होत चालली आहे.
ट्रंप यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर लिहिले आहे की, भारत केवळ मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत नाही, तर त्यातील बराचसा तेल जागतिक बाजारात विकून मोठा नफा कमावत आहे. त्यांना युक्रेनमध्ये रशियन युद्धयंत्रामुळे किती लोक मरत आहेत याची काहीच फिकीर नाही.
क्रेमलिनने दिली पुष्टी
या साऱ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेटणार असल्याची पुष्टी क्रेमलिनकडून करण्यात आली आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंमध्ये या बैठकीसाठी समन्वय सुरु आहे आणि जागा ठरवली गेली असून लवकरच अधिकृत तपशील जाहीर केला जाईल.
भारताचा निषेध
भारत सरकारने ट्रम्प प्रशासनाच्या नव्या टॅरिफ निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारताने हा निर्णय अन्यायकारक, अन्याय्य आणि अवाजवी असल्याचे म्हटले आहे. भारताने रशियाशी असलेले ऊर्जा व्यवहार कायदेशीर असून राष्ट्रीय हिताला अनुसरून असल्याचे स्पष्ट केले आहे.
व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा भारत-रशिया धोरणात्मक भागीदारीला अधिक बळ देणारा ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा भारताला आंतरराष्ट्रीय दबावाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची परराष्ट्र धोरणे पुन्हा विचारात घ्यावी लागण्याची वेळ आली आहे.
