शास्त्रज्ञांनी शुक्र ग्रहाजवळ प्रदक्षिणा घालणारे 20 मोठे लघुग्रह शोधून काढले आहेत जे भविष्यात पृथ्वीला धडक देऊ शकतात. या लघुग्रहांना भयावहपणे ‘सिटी किलर्स’ असे टोपणनाव देण्यात आले आहे.अंतराळातील असे काही खडक कधीतरी आपल्या ग्रहावर आदळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ब्राझीलमधील साओ पाउलो स्टेट युनिव्हर्सिटीमधील संशोधक या लघुग्रहांचा अभ्यास करत आहेत आणि त्यांनी शोधले आहे की हे लघुग्रह शुक्र ग्रहाजवळ प्रदक्षिणा घालतात. यामध्ये काही ‘ट्रोजन’ लघुग्रह आहेत, जे ग्रहाच्या कक्षेत पुढे किंवा मागे स्थिर स्थितीत राहतात. याशिवाय ‘झूझवे’ नावाचा एक अजब ‘क्वासी-मून’ देखील आहे. या लघुग्रहांची एक धक्कादायक बाब म्हणजे त्यांची अनियमित कक्षा – म्हणजेच ते कोणत्याही ग्रहाभोवती ठराविक मार्गाने फिरत नाहीत, त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे कठीण होते.
advertisement
शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की हे लघुग्रह मंगळ आणि गुरू यांच्यामधील मुख्य लघुग्रह पट्ट्यातून आले आहेत आणि त्यांचा व्यास 140 मीटरपेक्षा जास्त आहे. यापैकी कोणत्याही एका लघुग्रहाचा पृथ्वीशी धडक झाल्यास, एका संपूर्ण शहराच्या पातळीवर विध्वंस होऊ शकतो.
सध्या हे लघुग्रह पृथ्वीपासून खूप दूर आहेत आणि तातडीचा धोका नाही. मात्र शुक्र ग्रह पृथ्वीपासून केवळ 4 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. जर या लघुग्रहांच्या कक्षेत किंचित बदल झाला तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्यांना खेचू शकते आणि अशा परिस्थितीत एक भयावह धडक टाळणे अवघड होईल.
या लघुग्रहांपैकी अनेकजण अनिश्चित, झिगझॅग मार्गाने फिरतात आणि केवळ पृथ्वीजवळ आले की दृश्यमान होतात. याशिवाय त्यांपैकी बरेच लघुग्रह सूर्याच्या तेजामुळे दिसेनासे होतात आणि त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे अशक्य होते.
या अभ्यासाचे मुख्य लेखक वालेरियो करुब्बा यांनी सांगितले, आपण या लघुग्रहांनी निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याला कमी लेखू नये, पण हेही खरे आहे की सध्या तातडीने घाबरण्याची गरज नाही.
