'न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, ही महिला सिमरन असे तिचे नाव असून ती 20 जून रोजी भारतातून अमेरिकेत आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरनची एक सीसीटीव्ही फुटेज मिळाली असून त्यात ती मोबाईल पाहताना आणि कुणाची तरी वाट पाहत असल्यासारखी दिसत आहे.
पोलिसांच्या मते, सिमरन एका लग्नासाठी न्यू जर्सीला आली होती. मात्र काही तपासानंतर असाही संशय व्यक्त करण्यात आला आहे की तिला लग्नाचा काहीच इरादा नव्हता आणि ती फक्त अमेरिकेच्या मोफत प्रवासासाठीच आली होती.
advertisement
सिमरन शेवटचे बुधवारी दिसली होती. तेव्हा ती राखाडी रंगाची स्वेटपँट, पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळे फ्लिप-फ्लॉप्स आणि हिऱ्याचे लहान कानातले घातलेली होती. शेवटच्या व्हिडिओमध्ये ती चिंतेत असल्यासारखी वाटत नाही, असे पोलिसांनी सांगितले.
सिमरनचे अमेरिकेत कोणतेही नातेवाईक नाहीत. तसेच तिला इंग्रजी देखील बोलता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. भारतात तिच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र तो यशस्वी ठरलेला नाही.
सिमरनचे वर्णन पोलिसांनी असे दिले आहे : उंची 5 फूट 4 इंच, वजन सुमारे 150 पाउंड, कपाळाच्या डाव्या बाजूला एक छोटा ओरखडलेला व्रण.
तिच्याकडे एक आंतरराष्ट्रीय फोन आहे जो केवळ Wi-Fi वरच सुरू होतो. सध्या तिच्या संभाव्य ठिकाणाबद्दल माहिती मिळवण्यासाठी भारतातील कोणत्याही कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे लिंडनवॉल्ड पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
सिमरनच्या बेपत्तेपणामागे कुठलाही घातपात झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा याच वर्षी मार्चमध्ये एक उच्च-प्रोफाइल केस समोर आली होती. पिट्सबर्ग विद्यापीठातील 20 वर्षांची विद्यार्थिनी सुदिक्षा कोनंकी ही डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये स्प्रिंग ब्रेक ट्रिप दरम्यान बेपत्ता झाली होती. सुदिक्षा ही भारताची नागरिक असून अमेरिकेची कायमस्वरूपी रहिवासी होती.
