काबुल / इस्लामाबाद : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सध्या युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पाकिस्तानने काबुलवर एअर स्ट्राइक केल्यानंतर अफगाण दलांनी प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी सीमावर्ती पोस्टवर हल्ला केला आणि काही चौक्यांवर कब्जा मिळवल्याचा दावा केला आहे. शनिवारी रात्री झालेल्या या संघर्षात पाकिस्तानचे 58 सैनिक ठार झाल्याचा आणि तालिबानचे 9 लढवय्ये शहीद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र सौदी अरेबिया आणि कतारच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमधील लढाई थांबवण्यात आली आहे.
advertisement
या वाढत्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा. त्याचे निर्णय आता केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियाचे राजकारण ठरवू शकतात, असे मानले जात आहे.
कोण आहे हिबतुल्लाह अखुंदजादा?
हिबतुल्लाह अखुंदजादा हा तालिबानचा सर्वोच्च धार्मिक नेता असून त्याला ‘अमीर अल-मोमिनीन’ म्हणजेच विश्वासूंचा प्रमुख म्हणतात. 1960 च्या दशकात जन्मलेला अखुंदजादा नूरजई जमातीचा आहे आणि दीर्घकाळ शरिया न्यायालयांचा प्रमुख राहिला आहे. लष्करी अनुभव नसतानाही तो तालिबानचा सर्वात प्रभावशाली आणि अंतिम निर्णय घेणारा नेता मानला जातो.
मे 2016 मध्ये अख्तर मन्सूर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर अखुंदजादा तालिबानचा नेता बनला. 2021 मध्ये तालिबानने सत्ता घेतल्यानंतर त्याने स्वतःला “इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान”चा सर्वोच्च नेता घोषित केले.
गूढ नेता
अखुंदजादा सार्वजनिक जीवनात फार क्वचितच दिसतो. त्याचे कोणतेही अलीकडचे फोटो किंवा व्हिडिओ उपलब्ध नाहीत. तो प्रामुख्याने कंधारमध्ये राहतो आणि धार्मिक सल्लागारांच्या गटामार्फत आदेश देतो.
महिलांवरील बंदी आणि शरिया कायदा
अखुंदजादाच्या आदेशांमुळे अफगाणिस्तानात महिलांवर शिक्षण, नोकरी आणि सार्वजनिक जीवनात बंदी घालण्यात आली. लोकशाही व्यवस्था संपवून त्याने पूर्ण शरिया कायदा लागू केला. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) त्याच्यावर मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचा आरोप ठेवला आहे.
पाकिस्तानविरोधी आणि भारतासोबत जवळीक?
अखुंदजादा सध्या पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांमुळे आणि सीमा वादांमुळे नाराज आहे. तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्या भारत भेटीपूर्वी अखुंदजादाशी झालेल्या बैठकीनंतर असे संकेत मिळत आहेत की तालिबान आता पाकिस्तानपासून अंतर राखून भारताशी संबंध मजबूत करण्याच्या तयारीत आहे.