राष्ट्रपती ट्रम्प यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवूनही त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीत अमेरिकेच्या मध्यस्थतेचा इन्कार केला आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबवूनही मला नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही. मी कितीही काही केलं, तरीही मला नोबेल मिळणार नाही. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी सहा वेळा नोबेल शांतता पुरस्काराचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यासोबतच रवांडा आणि काँगो यांच्यातील शांतता, सर्बिया आणि कोसोव्होमधील शस्त्रसंधी, इजिप्त आणि इथिओपियामधील शांतता, मिडल ईस्ट, रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-इराण संघर्षाचा उल्लेख करत शांततेच्या नोबेल पुरस्काराची गोष्ट मांडली. त्यांनी म्हटले की या सर्व प्रयत्नांनंतरही मला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार नाही.
advertisement
हे लक्षात घेतलं पाहिजे की- भारत सरकारने अनेक वेळा स्पष्टपणे सांगितले आहे की अमेरिकेच्या हस्तक्षेपाशिवाय आणि मध्यस्थतेशिवाय पाकिस्तानसोबतची शस्त्रसंधी ही त्यांच्या विनंतीवर करण्यात आली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट:
मला अत्यंत आनंदाने सांगावे वाटते की, मी आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मिळून काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि रवांडा प्रजासत्ताक यांच्यातील युद्धावर एक अत्यंत उत्तम तह घडवून आणला आहे. हे युद्ध विशेषतः हिंसाचार आणि मृत्यूंसाठी कुप्रसिद्ध होते आणि अनेक दशकांपासून चालू होते. रवांडा आणि काँगोचे प्रतिनिधी सोमवारी वॉशिंग्टनला दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी येणार आहेत. हा आफ्रिकेसाठी एक महान दिवस आहे आणि खरं सांगायचं तर, संपूर्ण जगासाठीही एक महान दिवस आहे!
मला या कामासाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याबद्दलही नाही, सर्बिया आणि कोसोव्हो यांच्यातील संघर्ष संपविल्याबद्दलही नाही, इजिप्त आणि इथिओपिया यांच्यात शांतता राखल्याबद्दलही नाही (एक प्रचंड धरण इथिओपियाने बांधले, जे अमेरिकेने मूर्खपणे आर्थिक मदत देऊन उभारले, त्यामुळे नाईल नदीतून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे).
अब्राहम करारांचं काम मी केले, जे यशस्वी झाल्यास मध्यपूर्वेत अनेक देश सहभागी होतील आणि हजारो वर्षांनंतर त्या भागात एकता निर्माण होईल. त्यासाठीही मला नोबेल पुरस्कार मिळणार नाही. रशिया-युक्रेन किंवा इस्रायल-इराण यांच्याबाबत मी काहीही केलं, तरीही मला शांततेसाठी नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.
पण जनतेला हे सगळं माहीत आहे आणि माझ्यासाठी फक्त तेच महत्त्वाचं आहे!