अलीपोव यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी धमकीच्या स्वरात भारत आणि रशिया दोघांच्याही अर्थव्यवस्थेला धक्का देण्याची भूमिका घेतली आहे. अशा स्थितीत रशिया-भारत यांचे आर्थिक संबंध हे ट्रम्प यांच्या टॅरिफच्या परिणामांचा सामना करण्यात मदतीचे ठरू शकतात.
advertisement
डेनिस अलीपोव यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, रशिया आणि भारत आर्थिक क्षेत्रात आपले सहकार्य वाढवत आहेत. यामध्ये पेमेंट सिस्टीम आणि बँकिंग कार्ड्स यांचा समन्वय करण्यावर विशेष भर दिला जात आहे. द्विपक्षीय सहकार्य केवळ व्यापार आणि आर्थिक संबंधांपुरते मर्यादित नसून त्यामध्ये राष्ट्रीय चलनांचा वापर करून व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्वतःची पेमेंट सिस्टीम तयार करणार
अलीपोव पुढे म्हणाले, रशिया आणि भारत आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी स्वतःच्या पेमेंट सिस्टीम्स आणि बँकिंग पायाभूत सुविधांचा समन्वय करत आहेत. यामागे उद्देश आहे की रशिया आणि भारत यांच्यातील आर्थिक देवाण-घेवाण सुलभ आणि अडथळे विरहित व्हावी. त्यांनी स्पष्ट केले की, द्विपक्षीय व्यापारातील सध्याच्या असंतुलनामुळे राष्ट्रीय चलनांच्या माध्यमातून व्यवहार करणे हे विशेष महत्त्वाचे झाले आहे.
रशिया आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंध हे येणाऱ्या रशिया-भारत शिखर परिषदेचे मुख्य केंद्र असतील. या वर्षअखेरीस रशिया आणि भारतात अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय कार्यक्रमांची आखणी केली गेली आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा देखील समाविष्ट आहे. या दौऱ्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाऊ शकतात, असे अलीपोव यांनी सांगितले.
ट्रम्प यांचे टॅरिफ निष्फळ ठरणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी 30 जुलै रोजी भारत आणि रशियाच्या व्यापारी संबंधांचा उल्लेख करत भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती पोस्ट करत 1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे.
अमेरिकेच्या 25 टक्के टॅरिफसह रशियाकडून तेल खरेदीवर अतिरिक्त दंड आकारण्याच्या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत जर रशियासोबतचे भारताचे आर्थिक संबंध अधिक दृढ झाले, तर या टॅरिफचा परिणाम काही प्रमाणात सौम्य होऊ शकतो, असा सूचक इशारा अलीपोव यांनी दिला आहे.
