मॉस्को: युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने एका रात्रीत रशियाच्या 361 ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले. ज्यात देशातील सर्वात मोठ्या तेल रिफायनरींपैकी एक असलेल्या ठिकाणाचाही समावेश आहे. या हल्ल्यामुळे रशियाच्या वायव्य भागातील किरिशी तेल रिफायनरीमध्ये आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
advertisement
प्रमुख तेल रिफायनरीवर हल्ला
किरिशी रिफायनरी ज्याला Kirishinefteorgsintez (KINEF) म्हणूनही ओळखले जाते. ही रशियातील पहिल्या दोन मोठ्या रिफायनरीपैकी एक आहे. या रिफायनरीमध्ये वर्षाला सुमारे 17.7 दशलक्ष मेट्रिक टन कच्चे तेल शुद्ध केले जाते. जे दररोज सुमारे 3,55,000 बॅरल एवढे आहे. हे रशियाच्या एकूण शुद्धीकरण क्षमतेच्या जवळपास 6.4% आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये रिफायनरीला भीषण आग लागलेली दिसत आहे. आणि आकाशात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही आग एका ड्रोनला हवेत पाडल्यानंतर त्याच्या अवशेषांमुळे लागली. लेनिनग्राद प्रांताच्या गव्हर्नरने सांगितले की- रशियन हवाई संरक्षण प्रणालीने किरिशीजवळ किमान तीन ड्रोन पाडले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार ही आग आता विझवण्यात आली आहे.
रशियाचा दावा आणि युक्रेनची पुष्टी
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की- त्यांनी सर्व 361 ड्रोन हवाई संरक्षण प्रणालीद्वारे पाडले. या हल्ल्यात चार मार्गदर्शित हवाई बॉम्ब आणि अमेरिकेत तयार केलेल्या HIMARS क्षेपणास्त्राचाही समावेश होता, असे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र सर्व हल्ल्यांची ठिकाणे त्यांनी स्पष्ट केली नाहीत.
युक्रेनच्या ड्रोन कमांडने किरिशीवर हल्ला केल्याची पुष्टी केली आणि या कारवाईला यशस्वी हल्ला म्हटले. या हल्ल्याच्या एक दिवस आधी युक्रेनियन ड्रोनने Bashneft या रशियन कंपनीच्या उफा (युक्रेनच्या सीमेपासून सुमारे 1,400 किमी दूर) येथील आणखी एका मोठ्या तेल शुद्धीकरण संकुलावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात एक ड्रोन रिफायनरीवर कोसळल्यामुळे आग लागली होती. तर दुसरा पाडण्यात आला. या हल्ल्यात किरकोळ नुकसान झाले होते आणि कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
फेब्रुवारी 2022 पासून रशियाने युक्रेनवर पूर्ण-प्रमाणात आक्रमण केल्यापासून युक्रेनकडून रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. रिफायनरी आणि पाइपलाइनवरील हे हल्ले रशियाला युद्धासाठी मिळणाऱ्या निधीवर अंकुश ठेवण्याच्या युक्रेनच्या धोरणाचा भाग आहेत.
ट्रम्प यांचा नाटोवर दबाव
दरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो (NATO) मित्रराष्ट्रांवर रशियावरील ऊर्जा निर्बंध अधिक कठोर करण्यासाठी दबाव वाढवला आहे. याचा उद्देश रशियाचे उत्पन्नाचे स्त्रोत थांबवणे आणि युक्रेनमधील युद्ध समाप्त करणे आहे. जे ट्रम्प यांना अजूनही यशस्वीपणे सोडवता आलेले नाही.
शनिवारी ट्रम्प म्हणाले की- अमेरिका रशियावर नवीन ऊर्जा निर्बंध लादण्यास तयार आहे. पण फक्त तेव्हाच जेव्हा सर्व नाटो देश रशियन तेल खरेदी करणे थांबवतील आणि असेच निर्बंध लागू करण्यास सहमत होतील.