कीव / वॉशिंग्टन : युक्रेनियन अधिकाऱ्यांनी मंगळवारी दावा केला की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या सरकारवर दबाव आणला, की त्यांनी डोनबास (Donbas) प्रदेश रशियाला देऊन टाकावा. हा दावा रशिया आणि अमेरिका यांच्यातील आगामी उच्चस्तरीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे.
advertisement
डोनबास प्रदेश म्हणजे काय?
डोनबास (Donets Basin) हा युक्रेनचा औद्योगिक कणा (industrial heartland) मानला जातो. हा प्रदेश डोनेत्स्क (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या दोन पूर्वेकडील ओब्लास्ट (प्रांत) व्यापतो. येथे कोळसा, लोखंड धातू (iron ore) आणि इतर खनिजसंपत्ती मुबलक प्रमाणात आहे. ज्यामुळे सोव्हिएत काळात हा प्रदेश जड उद्योग, खाणकाम आणि धातुकर्माचा केंद्रबिंदू होता.
डोनेत्स्क, लुहान्स्क आणि मारीउपोल (Mariupol) ही येथील प्रमुख औद्योगिक शहरे आहेत. मारीउपोल 2022 मध्ये रशियन सैन्याने वेढा घालून ताब्यात घेतले होते. काही आठवड्यांच्या शहरी लढाईत हजारो नागरीक ठार झाले आणि शहर जवळपास पूर्णतः उद्ध्वस्त झाले.
पुतिन-ट्रम्प शिखर परिषदची तयारी
हा वादग्रस्त आरोप अशा वेळी समोर आला आहे की, ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची संभाव्य शिखर परिषद बुडापेस्ट (हंगेरी) येथे होण्याची चर्चा आहे. झेलेन्स्की यांना या परिषदेसाठी निमंत्रण नाही. मात्र त्यांनी सांगितले आहे की, ते सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. क्रेमलिनने सांगितले की, अद्याप कोणतीही तारीख निश्चित नाही कारण “गंभीर तयारीची आवश्यकता” आहे.
युरोपियन नेत्यांची सामाईक भूमिका
दरम्यान झेलेन्स्की यांच्यासह 11 जागतिक नेत्यांनी युक्रेनमधील सध्याच्या संघर्षरेषेला स्थिर ठेवून (freeze the current front line) युद्धविराम आणि चर्चेला प्रारंभ करण्याचे आवाहन करणारे एक संयुक्त निवेदन स्वाक्षरी केले आहे.
या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, जर्मनीचे फ्रेडरिक मर्ज, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, पोलंडचे डोनाल्ड टस्क, युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डेर लेयेन, युरोपियन कौन्सिलचे अंतोनिओ कोस्टा, नॉर्वेचे जोन्स गार स्टोरे, फिनलंडचे अलेक्झांडर स्टब, डेन्मार्कच्या मेते फ्रेडरिकसन, स्पेनचे पेड्रो सांचेज आणि स्वीडनचे उल्फ क्रिस्टरसन यांचा समावेश आहे.
या नेत्यांनी सांगितले- आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भूमिकेला पाठिंबा देतो की संघर्ष तात्काळ थांबवला पाहिजे आणि सध्याची संपर्करेषा ही चर्चेचा प्रारंभबिंदू असावी. आम्ही अजूनही या तत्त्वावर ठाम आहोत की, आंतरराष्ट्रीय सीमा बलपूर्वक बदलल्या जाऊ नयेत.
तात्पुरता तह नको
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी या प्रस्तावाला नकार दिला. ते म्हणाले, मॉस्को केवळ दीर्घकालीन आणि शाश्वत शांततेत रस दाखवत आहे. त्यांच्या मते, सध्याच्या संपर्करेषेवर युद्ध थांबवणे म्हणजे फक्त तात्पुरता युद्धविराम (temporary ceasefire) ठरेल, जो दीर्घकाळ टिकणार नाही.
झेलेन्स्की यांचा प्रत्युत्तराचा सूर
झेलेन्स्की यांनी सांगितले की, पुतिन पुन्हा राजनैतिक मार्गाकडे परतले आहेत. कारण गेल्या आठवड्यात त्यांनी ट्रम्प यांना फोन केला, जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनला लाँग-रेंज टोमहॉक क्षेपणास्त्र (Tomahawk Missiles) देण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण जसेच दबाव कमी झाला, रशियन पुन्हा संवाद टाळण्याचा प्रयत्न करू लागले, झेलेन्स्की यांनी मंगळवारी टेलिग्राम पोस्टद्वारे म्हटले. हे युद्ध संपवायचं असेल, तर दडपण कायम ठेवावं लागेल. केवळ दबावातूनच शांती मिळेल.
ट्रम्प यांची बदलती भूमिका
फक्त महिनाभरापूर्वी ट्रम्प यांनी म्हटले होते की, युक्रेनला आपला काही भूभाग सोडावा लागेल. मात्र आता त्यांनी ती भूमिका बदलून सांगितले की, युक्रेनला आपली गमावलेली सर्व भूमी परत मिळवण्याची संधी आहे. परंतु गेल्या आठवड्यात पुतिनशी झालेल्या फोनवर आणि झेलेन्स्कीशी झालेल्या भेटीनंतर ट्रम्प यांनी पुन्हा आपली भूमिका बदलली आणि दोन्ही देशांना आवाहन केले की, जिथे आहेत तिथेच थांबा.
रविवारी ट्रम्प यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं. डोनबासला विभागलं पाहिजे (cut up), ज्यातील बहुतांश भाग रशियाकडे राहू द्यावा, असे ते म्हणाले. जरी मला वाटतं की युक्रेन कधीतरी विजय मिळवू शकेल, तरी आता मला त्याबद्दल शंका वाटते, असेही त्यांनी स्पष्ट केले.