इराणच्या न्यायिक वेबसाईट ‘मिजान ऑनलाइन’नुसार, मोसायबीला न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोषी ठरवण्यात आले आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम ठेवली. फाशीची ही कारवाई अशा काळात झाली आहे जेव्हा इराण सातत्याने परकीय गुप्तचर नेटवर्कशी संबंधित असल्याच्या संशयावरून लोकांवर कारवाई करत आहे.
इराणच्या पोलिसांनी सांगितले की, 13 जूनला इस्रायली हल्ल्यानंतर आतापर्यंत एकूण 22 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण इस्रायली गुप्तचर संस्थेशी संबंधीत असल्याचा संशय आहे. या अटकांची माहिती फार्स न्यूज एजन्सीने दिली असून, अटक करण्यात आलेल्या सर्व व्यक्ती कुम प्रांतातील आहेत. त्यांच्यावर इस्रायली गुप्तचर यंत्रणेशी संबंध ठेवणे, जनतेमध्ये भय निर्माण करणे आणि गुन्हेगारी सरकारला समर्थन देणे अशा आरोपांखाली कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
याशिवाय गेल्या गुरुवारी आणखी 24 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर इस्रायली सरकारसाठी काम करणे आणि इराणची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. टास्नीम न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, एका युरोपीय नागरिकालाही गुप्तहेरगिरीच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. मात्र त्याची राष्ट्रीयता किंवा अटकेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
गुप्तहेरगिरीविरोधातील कडक पवित्रा
गेल्या काही आठवड्यांत इराणने इस्रायली संपर्क असल्याच्या संशयावरून अनेकांना अटक केली असून, त्यातील काहींना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. नॉर्वेमधील मानवी हक्क संस्थेच्या (Iran Human Rights) माहितीनुसार, आतापर्यंत किमान 223 लोकांना इस्रायलशी कथित संबंधांमुळे अटक करण्यात आली आहे. आणि ही संख्या प्रत्यक्षात याहूनही जास्त असू शकते.
भारतासाठी का आहे ही घटना महत्त्वाची?
भारताचे इराण आणि इस्रायल दोघांशीही राजकीय संबंध आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमधील वाढता तणाव केवळ पश्चिम आशियाच नव्हे, तर जागतिक स्थैर्यालाही धोका निर्माण करू शकतो. विशेषतः जेव्हा भारत चाबहार बंदर आणि IMEC कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांमध्ये दोन्ही देशांच्या सहकार्याने गुंतवणूक करत आहे. तेव्हा अशा घटना भारतासाठी नवी आव्हाने उभी करू शकतात.
