ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारत मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत आहे आणि ते खुल्या बाजारात मोठ्या नफ्याने विकतही आहे. युक्रेनमध्ये “रशियन वॉर मशीन” मुळे किती लोक मारले जात आहेत याची भारताला पर्वा नाही, असेही त्यांनी म्हटले.
यापूर्वीही ट्रम्प यांनी भारतावर रशियन कच्चे तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल 25% आयात शुल्क आणि इतर काही दंड लावला होता. मात्र यावेळी ते आयात शुल्कात किती वाढ करतील, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
advertisement
ट्रम्प यांनी लिहिले, भारत केवळ मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत नाहीये, तर खरेदी केलेल्या तेलाचा मोठा भाग ते खुल्या बाजारात मोठ्या नफ्याने विकत आहेत. युक्रेनमध्ये रशियन वॉर मशीनमुळे किती लोक मारले जात आहेत, याची त्यांना पर्वा नाही. यामुळे मी अमेरिकेत भारताकडून घेतले जाणारे आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!!!
भारत-रशिया संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ट्रम्प गेल्या आठवड्यात म्हणाले होते की, भारताने मॉस्कोसोबत किती व्यवसाय करावा याची त्यांना काळजी नाही. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारताच्या उच्च आयात शुल्काचा आणि रशियासोबतचे लष्करी व ऊर्जा संबंध सुरू ठेवल्याचा हवाला देत सर्व भारतीय वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली होती.
तरीही भारतीय सरकारने आतापर्यंत कोणतीही प्रतिशोधात्मक कारवाई केलेली नाही आणि ते या आयात शुल्काचे परिणाम तपासत असल्याचे म्हटले आहे. सरकारने म्हटले आहे की- भारताच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 30 जुलै रोजी एका निवेदनात म्हटले होते की, भारत आणि अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून एक न्याय्य, संतुलित आणि परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करार पूर्ण करण्याच्या वाटाघाटींमध्ये गुंतले आहेत.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सरकार आपल्या शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (MSMEs) कल्याण जपण्यास आणि प्रोत्साहन देण्यास अत्यंत महत्त्व देते. यूकेसोबत झालेल्या नवीनतम सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारासह (Comprehensive Economic and Trade Agreement) इतर व्यापार करारांप्रमाणेच, सरकार आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल.
