न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्याने संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा अणुशस्त्रांच्या धोक्याकडे वळवले आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की पाकिस्तान हा त्या काही देशांपैकी एक आहे, जे सध्या सक्रियपणे परमाणु शस्त्रांची चाचणी करत आहेत.
advertisement
ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले की, रशिया चाचण्या करतोय, चीन करतोय, उत्तर कोरियासोबत पाकिस्तानही हेच करत आहे. फरक एवढाच की ते खुलेपणाने सांगत नाहीत, भूमिगत चाचण्या करतात आणि बाहेरच्या जगाला त्याचा अंदाज येत नाही. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, या चाचण्यांमुळे हलके कंपन जाणवतात, पण त्याचा थेट पुरावा मिळत नाही. त्यांनी असा इशारा दिला की, आता अमेरिका शांत बसणार नाही, आम्हालाही आमच्या सुरक्षा आणि शक्तीचे प्रदर्शन करावेच लागेल.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. त्यांच्या दाव्यामुळे असा प्रश्न उभा राहिला आहे की, काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये जे भूकंपाचे झटके जाणवले होते, ते नैसर्गिक होते की अणुचाचण्यांमुळे निर्माण झाले? मे महिन्यात सलग तीन दिवस पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता आणि त्या वेळीच काही तज्ज्ञांनी गुप्त अणुचाचणीची शक्यता व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी या पार्श्वभूमीवर असेही म्हटले की, अमेरिका ही एक ओपन सोसायटी आहे, इथे लोक प्रश्न विचारतात आणि माध्यमं सत्य मांडतात. पण चीन, रशिया किंवा पाकिस्तानसारखे देश सगळं लपवतात. ते गुप्तपणे काम करतात आणि जगाला फसवतात.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी 33 वर्षांपूर्वी लागू केलेल्या ‘न्यूक्लियर टेस्ट मोरॅटोरियम’, म्हणजेच अणुचाचण्यांवरील बंदी, हटवण्याचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले, जर इतर देश सतत अणुचाचण्या करत असतील, तर अमेरिका मागे का राहावी? आमच्याकडे जगातील सर्वाधिक अणुशस्त्रे आहेत आणि आता आम्हालाही त्यांची ताकद दाखवायची आहे. ट्रम्प यांच्या मते, त्यांनी रशिया आणि चीन दोघांशीही अणुशस्त्रनिर्मूलन (Denuclearisation) या विषयावर चर्चा केली आहे. पण जेव्हा तेच देश स्वतःच चाचण्या करत आहेत, तेव्हा अमेरिकेने थांबण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे त्यांनी संरक्षण विभागाला तातडीने अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
तज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक अणुशस्त्र संतुलनावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे नव्या शस्त्रस्पर्धेची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आपल्या विधानात ट्रम्प यांनी सर्व अणुशस्त्रधारी देशांचा उल्लेख केला. पण भारताचा उल्लेख टाळला. त्यांनी भारताचे नाव घेतले नाही आणि त्याच्या अणुकार्यक्रमावर कोणतीही टिप्पणी केली नाही. विश्लेषकांच्या मते, हा भारताच्या जबाबदार अणुनीतीचा अप्रत्यक्ष सन्मान आहे.
पाकिस्तानचा अणुकार्यक्रम हा भारतासोबत झालेल्या 1971 च्या युद्धानंतर सुरू झाला. तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली 1970 च्या दशकाच्या मध्यात पाकिस्तानने अणुशक्ती विकसित करण्याचा प्रयत्न केला. 1980 आणि 1990 च्या दशकात अनेक गुप्त प्रयोग झाले आणि शेवटी 28 मे 1998 रोजी बलुचिस्तानच्या चागाई येथे पाकिस्तानने पहिली सार्वजनिक अणुचाचणी केली. हा प्रयोग भारताच्या पोखरण–II चाचणीनंतर काही दिवसांनी झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने स्वतःला अधिकृत अणुशक्ती संपन्न देश घोषित केले.
गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, पाकिस्तानने 1998 पूर्वीच शस्त्र-स्तरीय तंत्रज्ञान विकसित केले होते आणि अनेक “सब-क्रिटिकल” म्हणजेच लपवलेल्या अणुचाचण्या केल्या होत्या. मात्र पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांची उपस्थिती, राजकीय अस्थिरता आणि अस्पष्ट अणुनीतीमुळे या देशाच्या अणुशस्त्रसाठ्याबद्दल जगभरात कायमच चिंता व्यक्त केली जाते. आज ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे ही चिंता पुन्हा जागी झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय आता नव्या अणुयुगाच्या उंबरठ्यावर उभा असल्याची भीती निर्माण झाली आहे.
