ट्रम्प पूर्णपणे भारताविरोधात उघडपणे आलेत
ट्रम्प यांचा सध्याचा पवित्रा पाहता हे स्पष्ट दिसते की त्यांनी उघडपणे भारताच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांनी भारतासोबत व्यापार करार पूर्ण केला नाही आणि मुद्दाम त्यात अडथळे आणले. ज्यामुळे भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून रशियावर निशाणा साधता येईल. ट्रम्प यांनी भारतासोबतचा करार अर्धवट सोडून पाकिस्तानसोबत व्यापार करार पूर्ण केला. इतकेच नाही तर भारताने रशियाशी मैत्री ठेवली म्हणून त्याला शिक्षा देखील केली. दुसरीकडे पाकिस्तानसोबत व्यापार करार करून भारताच्या शेजारी देशाला बळकटी देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.
advertisement
ट्रम्प यांचे नवे जहरी वक्तव्य
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ’वर लिहिले, अमेरिकेने पाकिस्तानसोबत एक करार केला आहे. ज्याअंतर्गत हे दोन्ही देश दक्षिण आशियातील विशाल तेल साठ्याचा विकास करण्यासाठी एकत्र काम करतील. या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर तेलाचे साठे आहेत, पण अद्याप त्याचा योग्य वापर झाला नाही. पाकिस्तान आणि अमेरिका आता हे तेलसाठे विकसित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करतील. सध्या आम्ही त्या तेल कंपनीची निवड करत आहोत जी या भागीदारीचे नेतृत्व करेल. कोण जाणे, कदाचित एक दिवस पाकिस्तान भारतालाच तेल विकू लागेल. ट्रम्प यांचे हे वक्तव्य भारताला अपमानित करण्याचा आणि पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शवण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे.
ट्रम्प यांच्या भूमिकेवर आश्चर्य
जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक बसु यांनी सांगितले की, भारताविषयी अमेरिकेचा दृष्टिकोन दुर्दैवी वळण घेत आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताविषयीचा कठोर दृष्टिकोन खरोखरच धक्कादायक आहे. अमेरिकेने भारतासोबत मोठ्या व्यापार तुटीचे कारण देत भारतीय आयातीवर मोठे शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी भारताला अत्यधिक आयात शुल्क वसूल करणारा देश असे म्हटले. पण त्यांच्या दाव्यांमध्ये फारसे तथ्य नाही. अमेरिकेचा भारतासोबतचा व्यापार तुटीचा आकडा फक्त 41 अब्ज डॉलर आहे. जे चीन (270 अब्ज डॉलर) किंवा व्हिएतनाम (113 अब्ज डॉलर) यांच्याशी तुलना करता खूपच कमी आहे.
ट्रम्प इतके का बदलले?
बसु यांनी म्हटले, ही स्थिती म्हणजे भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचे बिनशर्त समर्थन केल्याचे फळ आहे. त्यामुळेच अमेरिका आता भारताला पूर्वीपेक्षा कमी महत्त्व देत आहे. भारत पूर्वी आपल्या स्वतंत्र धोरणासाठी ओळखला जायचा. पण ट्रम्प यांना अंधपणे समर्थन देऊन भारत स्वतःच अडचणीत सापडला आहे.
सध्या कॉर्नेल विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले बसु पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या धोरणाचा एक प्रमुख उद्देश म्हणजे भारताच्या कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात प्रवेश करणे. जर भारत अमेरिकेच्या मागण्यांसमोर नमतं घेतलं आणि त्यांच्या अटींप्रमाणे करार केला. तर याचा भारतातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
