वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची सीक्रेट सर्व्हिस सुरक्षा हटवली आहे. ही माहिती व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने CBS न्यूजला दिली. अमेरिकन कायद्यांनुसार माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांना पद सोडल्यानंतर जास्तीत जास्त सहा महिने सीक्रेट सर्व्हिसची सुरक्षा दिली जाते. कमला हॅरिस यांचा कार्यकाळ सात महिन्यांपूर्वीच संपला होता. त्यावरून ट्रम्प प्रशासनाने त्यांचा सुरक्षा कवच परत घेण्याचा निर्णय घेतला.
advertisement
हॅरिस यांच्या वरिष्ठ सल्लागार किर्स्टन ऍलन यांनी एका निवेदनात म्हटले, माजी उपराष्ट्राध्यक्षा सीक्रेट सर्व्हिसच्या व्यावसायिकतेबद्दल, समर्पणाबद्दल आणि सुरक्षेबाबत असलेल्या वचनबद्धतेबद्दल आभारी आहेत. मात्र या पावलामुळे अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे. सीएनएनने सर्वप्रथम ही माहिती दिली होती की ट्रम्प प्रशासनाने हॅरिस यांची सुरक्षा हटवली आहे.
ट्रम्पचा हा पहिला निर्णय नाही
हा पहिलाच प्रसंग नाही. दुसऱ्या कार्यकाळात परतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक हाय-प्रोफाईल लोकांची सुरक्षा हटवली आहे. यात जॉन बोल्टन (माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) तसेच हंटर बायडेन आणि ऍश्ले बायडेन (जो बायडेन यांची मुले) यांचा समावेश आहे.
अमेरिकन नियमांनुसार माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नींना आयुष्यभर सुरक्षा दिली जाते. मात्र त्यांच्या मुलांना केवळ 16 वर्षे वयापर्यंतच सुरक्षा मिळते. विशेष बाब म्हणजे बायडेन यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरीस एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साइन केली होती. ज्यामुळे त्यांच्या प्रौढ मुलांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
CDC डायरेक्टर सुसान मोनारेज यांना हटवले
अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आरोग्य संस्थेच्या – सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या डायरेक्टर सुसान मोनारेज यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मध्यरात्री स्वतः पदावरून बर्खास्त केले. व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरीनुसार मोनारेज राष्ट्राध्यक्षांच्या मिशनशी जुळत नव्हत्या आणि त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता.
मोनारेज यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की- त्यांना विज्ञानाच्या बाजूने उभे राहिल्याची शिक्षा देण्यात आली. दरम्यान संस्थेतील इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पदाचा राजीनामा दिला.
आम्हाला माहीत होते की त्या गेल्या तर वैज्ञानिक नेतृत्व संपून जाईल. जेव्हा त्या टिकू शकल्या नाहीत तेव्हा आम्हीही सोडून जाण्याचा निर्णय घेतला,असे एका अधिकाऱ्याने AP ला सांगितले.