गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर नेतन्याहू यांच्याबाबतच्या चर्चेला अचानक वेग आला. याचे कारण म्हणजे त्यांच्या एका जुन्या व्हिडिओमधील काही स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले होते. त्या चित्रांमध्ये त्यांच्या हाताला सहा बोटे असल्यासारखे दिसत असल्याचा दावा काही युझर्सनी केला. त्यामुळे अनेक कटकारस्थानाच्या चर्चा सुरू झाल्या. हे सर्व त्या वेळी घडले जेव्हा इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढलेला होता आणि अमेरिका-इस्त्रायल संघर्षानंतर इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे संपूर्ण खाडी प्रदेशातील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली होती.
advertisement
ही चर्चा पुन्हा तेव्हा उफाळून आली, जेव्हा नेतन्याहू यांच्या अधिकृत X अकाउंटवरून एक विनोदी अंदाजातील व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कॅफेमध्ये कॉफी ऑर्डर करताना दिसतात. हा व्हिडिओ Sataf Café येथे शूट केल्याचे सांगितले जाते.
व्हिडिओमध्ये नेतन्याहू कॉफी देणाऱ्या विक्रेत्याचे आभार मानताना दिसतात. त्यानंतर ते कॅमेरामनशी बोलताना सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर विनोदी प्रतिक्रिया देतात. मी कॉफीसाठी मरतोय, असे ते हलक्या फुलक्या शैलीत म्हणतात. त्यानंतर ते दोन्ही हात वर करून प्रेक्षकांना बोटांची संख्या मोजा असे म्हणत इंटरनेटवर फिरत असलेल्या फेरफार केलेल्या व्हिज्युअल्सबद्दल टोमणा मारतात.
व्हिडिओच्या शेवटी ते कॉफीचा कप उचलतात आणि “L’chaim” म्हणजेच “जीवनासाठी” असे म्हणत टोस्ट करतात.
मात्र हा विनोदी व्हिडिओ अधिकच चर्चेत आला, जेव्हा Grok या एआय चॅटबॉटने एका युझर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना दावा केला की हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेला असू शकतो. ग्रोकने हा व्हिडिओ ‘डीपफेक’ असल्याचा दावा करत असेही म्हटले की व्हिडिओमध्ये दाखवलेली घटना प्रत्यक्षात घडल्याचे कोणतेही स्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच हा कंटेंट प्रगत आणि अजून सार्वजनिकपणे उपलब्ध नसलेल्या एआय साधनांचा वापर करून तयार करण्यात आला असावा, असेही सूचित करण्यात आले.
ग्रोकच्या या प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि व्हिडिओच्या प्रामाणिकतेबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले. अनेक सोशल मीडिया युझर्सनी ग्रोकच्या मताशी सहमती दर्शवत व्हिडिओमध्ये काही दृश्यात्मक विसंगती असल्याचा दावा केला. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की एआयने तयार केलेला आहे, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान या एआय-संबंधित दाव्यांबाबत इस्त्रायली अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
