वॉशिंग्टन: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना थेट लष्करी कारवाई करून अटक करण्यात आल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर जगभरात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय फक्त व्हेनेझुएलापुरताच मर्यादित राहणार आहे की अमेरिकेची जागतिक पातळीवर शक्ती वाढवण्याची नवी रणनीती आता उघडपणे समोर येत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. इराणमधील आंदोलनांना मिळणारे अप्रत्यक्ष अमेरिकी समर्थन या शंका अधिकच बळकट करत आहे.
advertisement
गार्डियनच्या अहवालानुसार, अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी मादुरोंची अटक ही प्रत्यक्षात “बेकायदेशीर सत्ताबदल” असल्याचे म्हटले आहे. कारण ही कारवाई कोणत्याही स्थानिक कायदेशीर प्रक्रियेविना किंवा आंतरराष्ट्रीय करारांचा आधार न घेता थेट लष्करी बळावर करण्यात आली. केवळ अमली पदार्थांची तस्करी किंवा बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याचे कारण पुढे केले जात असले, तरी हा प्रकार अमेरिकेच्या व्यापक लष्करी-राजकीय दबावनीतीची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. एका सार्वभौम देशात थेट हस्तक्षेप करण्यास अमेरिका मागेपुढे पाहणार नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे “पुढचा नंबर कुणाचा?” हा प्रश्न स्वाभाविक ठरतो.
व्हेनेझुएलावरील हल्ला जगाला रडवणार, अमेरिकेने सैतानाला जागे केले; सोने-चांदी...
व्हेनेझुएलानंतर कोण?
अमेरिकेच्या अंतर्गत हालचाली आणि आंतरराष्ट्रीय संकेत पाहता, काही विशिष्ट देश आता तिच्या फोकसमध्ये येऊ शकतात, असे चित्र आहे. हे ते देश असतील, ज्यांचे अमेरिकेशी दीर्घकाळापासून मतभेद किंवा वैचारिक संघर्ष राहिले आहेत. यात सर्वात मोठे नाव इराणचे घेतले जात आहे. ट्रम्प प्रशासनाकडून याआधीही इराणविरोधात लष्करी कारवाईच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात इराणवर ‘बारकाईने लक्ष ठेवले जात आहे’ असे संकेतही देण्यात आले. अमेरिकेच्या सुरक्षेला किंवा ऊर्जा हितसंबंधांना थेट धोका वाटल्यास मध्यपूर्वेत हस्तक्षेप करण्यास अमेरिका कचरणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
क्यूबावरही थेट रोख
इराणसोबतच क्यूबा हा अमेरिकेसाठी कायमच संवेदनशील मुद्दा राहिला आहे. क्यूबाने अनेकदा आरोप केला आहे की अमेरिका तेथील सरकार जबरदस्तीने बदलू इच्छिते. व्हेनेझुएलाच्या प्रकरणात क्यूबाने मादुरो सरकारला ऊर्जा आणि लष्करी मदत दिल्यामुळे तो ट्रम्प यांच्या निशाण्यावर असल्याचे मानले जाते. क्यूबाच्या मते, ही केवळ एक कारवाई नसून, दशकानुदशकांपासून सुरू असलेल्या अमेरिकन प्रभावविस्ताराच्या इच्छेचा भाग आहे.
ट्रम्प यांचा व्हेनेझुएलावर हल्ला; राष्ट्राध्यक्षांसह पत्नीला अटक, देशाबाहेर नेले
कोलंबियाशी थेट वाद
लॅटिन अमेरिकेतील कोलंबियानेही अमेरिकेच्या या पावलावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कोलंबियासह अनेक दक्षिण अमेरिकन देशांचे म्हणणे आहे की व्हेनेझुएलावरची अमेरिकी कारवाई प्रादेशिक स्थैर्य धोक्यात आणू शकते. मादुरोच लक्ष्य असते, तर लष्करी हस्तक्षेपाशिवाय इतर मार्ग उपलब्ध होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर ट्रम्प यांनी कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनाच थेट टोला लगावत “आधी स्वतःकडे पाहा” असा इशारा दिला.
युरोपही सुरक्षित नाही?
अमेरिकेची नजर आता युरोपकडेही वळत असल्याची चिन्हे आहेत. डेन्मार्क आणि ग्रीनलँडसारख्या भागांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. डेन्मार्कच्या संरक्षण गुप्तचर संस्थेने अलीकडेच एका अहवालात अमेरिकेला ‘मित्र’ नव्हे तर ‘संभाव्य धोका’ म्हणून नमूद केले आहे. अहवालानुसार, अमेरिका आता आपली आर्थिक व तांत्रिक ताकद केवळ प्रतिस्पर्ध्यांविरोधातच नाही, तर मित्रदेशांवरही दबाव टाकण्यासाठी वापरत आहे. ग्रीनलँडला अमेरिकेचा भाग बनवण्याची ट्रम्प यांची वारंवार व्यक्त होणारी इच्छा डेन्मार्कसाठी मोठा तणाव ठरली आहे. डेन्मार्कने स्पष्ट शब्दांत ग्रीनलँडची सार्वभौमता अबाधित राहील, असे सांगितले आहे.
नाटोची हमीही अपुरी?
विशेष म्हणजे डेन्मार्क हा नाटोचा संस्थापक सदस्य आहे. तरीही त्याच्या गुप्तचर अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेकडून आर्थिक निर्बंध, जादा टॅरिफ्स आणि गरज पडल्यास लष्करी दबावाचाही वापर होऊ शकतो. नाटोचा आर्टिकल-5, म्हणजे एका सदस्यावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला, ही हमीही भविष्यात अमेरिका नाकारू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेने उचलले व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना,पत्नी सिलिया फ्लोरेसची चर्चा
अमेरिका : ना मित्र, ना शत्रू?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आमूलाग्र बदल झाल्याचे दिसते. लष्करी कारवाईसोबतच आर्थिक निर्बंध, व्यापारयुद्ध, टॅरिफ्स यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोलंबिया, मेक्सिकोसारख्या देशांवर आर्थिक दबाव, युरोप आणि आशिया-प्रशांत क्षेत्रात वाढते तणाव यामुळे जागतिक राजकारण अस्थिर होत आहे. अमेरिका केवळ शेजारी देशांसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी नवी सुरक्षा आव्हाने उभी करत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.
