हे शत्रुत्व केवळ या दोन देशांपुरतीच मर्यादित नाही तर पश्चिम आशियातील अनेक युद्धांमागे आणि अस्थिरतेमागेही याच शत्रुत्वाचा हात आहे. दोन्ही देश आकाराने लहान असले तरी खूप प्रभावशाली आहेत. पण गेली अनेक दशके ते एकमेकांच्या रक्ताचे प्याले झाले आहेत.
प्रश्न – इराणने सर्वात आधी इस्रायलला देश म्हणून मान्यता दिली. मग हे दोघे मित्र ते शत्रू कसे झाले?
advertisement
– 1979 पर्यंत इराण आणि इस्रायल एकमेकांचे चांगले मित्र होते. 1948 मध्ये जेव्हा इस्रायलची स्थापना झाली. तेव्हा अनेक अरब देशांनी विरोध केला. पण इराणने 1950 मध्ये इस्रायलला मान्यता दिली होती. दोघांमध्ये कूटनीतिक, लष्करी आणि तेल व्यापाराचे संबंध होते. 1970 च्या दशकापर्यंत त्यांचे संबंध घट्ट होते.
1979 मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली आणि शाह रझा पहलवी यांची सत्ता गेली. अयातुल्ला खोमैनी यांच्या नेतृत्वाखाली कट्टर शिया इस्लामी प्रजासत्ताक स्थापन झाले. त्यानंतर इराणने इस्रायलला "सैतान" घोषित केले आणि म्हटले की, इस्रायलचा नाश व्हायलाच हवा. तेव्हापासूनच या दोघांमध्ये दुश्मनी सुरु झाली. इराण इस्रायलला बेकायदेशीर आणि बळकावलेला देश मानतो. तर इस्रायलला इराणकडूनच सर्वात मोठा धोका वाटतो.
प्रश्न – हे शत्रुत्व धर्माच्या आधारे आहे का?
– इराण एक शिया बहुल इस्लामी प्रजासत्ताक आहे. तो स्वतःला संपूर्ण इस्लामी जगाचा नेता मानतो. इस्रायल हे एक ज्यू राष्ट्र आहे. इराणची विचारधारा अशी आहे की, इस्रायलने जबरदस्तीने पॅलेस्टाईनवर ताबा घेतला आहे आणि तिथे पुन्हा इस्लामी सत्ता येणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, इस्रायल त्याच्या अस्तित्वासाठी त्या प्रत्येक देशाला शत्रू मानतो जो त्याच्या नाशाची भाषा करतो. अयातुल्ला खोमैनीपासून अयातुल्ला अली खामेनेईपर्यंत सर्व इराणी धर्मगुरू इस्रायलला “कॅन्सर” म्हणत आले आहेत.
प्रश्न – दोघांमध्ये कित्येक दशकांपासून प्रॉक्सी वॉर कसे सुरु आहे?
– हे दोन्ही देश सरळ युद्ध करत नाहीत. पण प्रॉक्सी युद्धात सक्रिय आहेत. एकमेकांचे नुकसान करण्याचा एकही संधी ते सोडत नाहीत. हे सतत सुरू असते.
प्रश्न – इस्रायलला इराणकडून कसा धोका आहे?
– इराणने मध्यपूर्वेत अनेक कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटना पोसलेल्या आहेत. ज्या इस्रायलविरुद्ध काम करतात. उदाहरणार्थ – हिजबुल्लाह (लेबनॉन), हमास (गाझा), इस्लामिक जिहाद मूव्हमेंट (फिलिस्तीन), आणि शिया मिलिशिया (इराक, सीरिया) हे सर्व गट इस्रायलवर रॉकेट हल्ले, घुसखोरी आणि आत्मघाती हल्ले करतात.
प्रश्न – या संघटनांपासून वाचण्यासाठी इस्रायल काय करतं?
– इस्रायल या संघटना आणि इराणच्या ठिकाणांवर हल्ले करत आला आहे. याची उदाहरणं आपण अलिकडच्या काळात पाहिली आहेत. इस्रायलने गाझा पट्टीला अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. हमासविरोधात युद्ध छेडले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाला हवाई आणि थल हल्ल्यांमधून जवळपास संपवले आहे. सीरियात इराण समर्थित गटांवर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलने इराणी अणुशास्त्रज्ञांना टार्गेट केले, सायबर हल्ले केले.
प्रश्न – मग इस्रायल इराणच्या अणु कार्यक्रमामुळे एवढा घाबरलेला का आहे?
– इस्रायलसाठी सध्या सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम आहे. इराणचा दावा आहे की, तो शांततेसाठी अणु ऊर्जा निर्माण करत आहे. पण इस्रायल व पाश्चिमात्य देशांचे म्हणणे आहे की, इराण गुपचूपपणे अणु बॉम्ब बनवत आहे.
इस्रायलची सुरक्षा नीती आहे की, आमचा कोणताही शत्रू अणुशस्त्र निर्माण करू नये. 1981 मध्ये इस्रायलने इराकचा अणु प्रकल्प आणि 2007 मध्ये सीरियाचा प्रकल्प हल्ला करून उद्ध्वस्त केला होता. इस्रायलने स्पष्ट म्हटले आहे की, तो कोणत्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाही.
प्रश्न – अलीकडे दोघांमध्ये हल्ले आणि तणाव का वाढले आहेत?
– एप्रिल 2024 मध्ये इस्रायलने दमिश्कमधील इराणी दूतावासावर मिसाईल हल्ला केला. यात इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारी ठार झाले. त्याच्या प्रत्युत्तरात इराणने 13 एप्रिल 2024 रोजी पहिल्यांदा थेट इस्रायलवर 300 पेक्षा जास्त ड्रोन आणि मिसाईल डागले. यातील बहुतांश इस्रायल व त्याचे मित्रदेश – अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स – यांनी पाडले. पण यातून तणाव शिगेला पोहोचला. मोठं युद्ध टळलं, पण संघर्ष कायम आहे.
प्रश्न – या शत्रुत्वाचा जागतिक परिणाम काय आहे? कोणत्या देशांचा पाठिंबा कोणा कडे आहे?
– अमेरिका आणि युरोप देश इस्रायलच्या बाजूने असतात. रशिया आणि चीन छुप्या पद्धतीने इराणला समर्थन देतात. अरब देश कधी इराणविरोधात असतात तर कधी तटस्थ राहतात. सौदी अरेबिया आणि युएईसारख्या देशांनी इस्रायलशी संबंध सामान्य केले आहेत.
प्रश्न – जर युद्ध झाले तर जगावर काय परिणाम होईल?
– जर दोघांमध्ये थेट युद्ध झाले तर खनिज तेल आणि गॅस पुरवठ्यावर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था ढासळू शकते.
प्रश्न – या दोघांमध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे का?
– सध्या तरी नाही. कारण ही दुश्मनी धर्म, राजकारण, वर्चस्व आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर आधारित आहे. जोपर्यंत पॅलेस्टाईन प्रश्न सुटत नाही, इराण अणु कार्यक्रम थांबत नाही, आणि दोघेही आपला कट्टरपंथी दृष्टिकोन बदलत नाहीत, तोपर्यंत तडजोड होण्याची शक्यता नाही.
प्रश्न – मग या दोघांमध्ये असेच छोटे छोटे युद्ध सुरू राहतील का?
– होय, तज्ज्ञांचेही मत आहे की, दोघे मोठ्या युद्धापासून टाळतील. पण मर्यादी हल्ले, छोटे युद्ध आणि अप्रत्यक्ष संघर्ष सुरुच राहतील.
