सिंधुदुर्ग - वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून त्याला भारतीय संस्कृतीतही महत्त्वाचे स्थान दिले आहे. अलिकडच्या वर्षांत भारतात वाघांच्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. तसेच देशात वाघांच्या संवर्धनासाठी सरकारने अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यातच आता सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या गावांमाध्ये वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाल्याने प्राणी मित्रांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा स्पेशल आढावा.
advertisement
काही वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत होती. तेथील शेतवाडीच्या भागात शेतकऱ्यांच्या गुरांवर पाळीव प्राण्यांवर वाघांकडून होणारे हल्ले हे त्या भागात वाघांच्या असलेल्या संख्येचे अस्तित्व जाणवून देणारे होते. मात्र, कालांतराने गावांचे होणारे शहरीकरण, गावात होणाऱ्या सुधारणा आणि या कारणांसाठी होणारी जंगलतोड, काही लोकांना असलेली शिकारीची सवय यासारख्या अनेक कारणांमुळे या वाघांची संख्या हळूहळू घटून शून्यावर आली. यामुळे वन्यप्रेमीमध्ये नाराजी स्पष्ट दिसु लागली होती. मात्र, आता अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सह्याद्रित वाघाचे दर्शन झाल्याने प्राणीमित्रांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या वनविभागाने केलेल्या वन्य प्राण्यांच्या जनगणनेत आंबोली ते मांगेली या सह्याद्रीच्या पट्ट्यात 8 वाघ आढळून आल्याने वनप्रेमींकडून संतोष व्यक्त केला जात आहे. आढळून आलेल्या 8 वाघांमध्ये 3 नर तर 5 मादी यांचा समावेश आहे. अलीकडच्या 2024 या कालावधीत वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात या वाघांची संख्या स्पष्ट झाली आहे. तर वाघांचा हा वाढता वावर निसर्गप्रेमींना एक सुखद धक्का देणारा आहे.
अनेक दशकांनी आला अनोखा योग, आयुष्यात येईल सुख-समृद्धी, नाशिकच्या महंतांनी काय सांगितलं?
वनविभागाचे अधिकारी काय म्हणाले -
याबाबत वनविभागाचे अधिकारी म्हणाले की, वाघांची वाढती संख्या स्पष्ट झाल्याने या वाघांची सुरक्षितता टिकून ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून कॅमेऱ्याच्या सर्वेनुसार सद्यस्थितीत 8 वाघांची नोंद झालेली आहे. वन्य प्राण्यांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे त्यांची नीट वाढ होत असल्याने तिथे वाघांची संख्या 8 आहे.
स्थानिक लोक आणि वनविभाग मिळून या प्राण्यांचे संरक्षण करत आहे. वेळोवेळी तिथे गस्त केली जाते. यासाठी काही वेळा तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. या प्राण्यांच्या होणाऱ्या शिकारीवर बंधन ठेवण्यासाठी नाईट व्हिजन ड्रोन कॅमेराचाही वापर केला जातो. यापुढे या क्षेत्रामध्ये तसेच जिल्ह्यात प्रोटेक्शन कॅम्पही घेतले जातील. यामुळे इथे होणारे वन्य प्राण्यांच्या शिकारीला आळा बसेल. तसेच या वाघांच्या संरक्षणासाठी आमच्याकडून पूर्णपणे प्रयत्न केले जातील. कंझर्व्हेशन रिझर्व्ह झाले असल्या कारणाने मॅनेजमेंट प्लॅनमध्ये असलेल्या प्रत्येक नियमांचे पालन केले जाईल, असेही वन अधिकाऱ्यांनी सांगितले.