जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट्स मिळतात; पण चॉकलेटला सर्वाधिक पसंती दिली जाते. खास प्रसंगी चॉकलेट भेट देण्याचा ट्रेंडदेखील आहे. जगात वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स उपलब्ध असून, त्यांपैकी काही चॉकलेट्स अत्यंत महागडी आहेत. खरं तर 7 जुलैला जागतिक चॉकलेट दिन साजरा केला जातो. त्याशिवाय फेब्रुवारीत व्हॅलेंटाइन वीकमध्ये 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा करतात. 2009मध्ये जगात पहिल्यांदा जागतिक चॉकलेट दिन साजरा केला गेला. 1550मध्ये या दिवशी पहिल्यांदा युरोपात चॉकलेट लाँच झालं होतं. त्यामुळे हा दिवस चॉकलेटचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. चॉकलेटच्या किमतीचा विचार केला तर काही चॉकलेट्स अगदी स्वस्त असतात; पण काही चॉकलेट्स इतकी महाग असतात, की त्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात.
advertisement
आर्ट सीरीज गुआयासामिन हे महागड्या चॉकलेटपैकी एक होय. हे चॉकलेट 77 टक्के कोकोच्या बिया आणि इक्वेडोर डार्क चॉकलेटच्या मिश्रणातून तयार केलं जातं. हे चॉकलेट केवळ 50 ग्रॅमचं असतं; पण एवढ्या लहान चॉकलेटची किंमत 33 हजार रुपये असते. तुम्ही जर हे चॉकलेट ऑर्डर केलं तर त्याची डिलिव्हरी मिळण्यासाठी सहा आठवडे लागतात.
डी लाफे गोल्ड चॉकलेट बॉक्स खास असतो. 24 कॅरेट सोन्यानं हायलाइट केलेल्या या चॉकलेट बॉक्सला 1919 ते 1920 पर्यंतची अस्सल सोन्याची नाणी लावण्यात आली आहेत. या चॉकलेटला सोन्याची चव नसते; पण यामुळे डार्क चॉकलेटला खास चमक येते, असं या चॉकलेटच्या उत्पादकांचं म्हणणं आहे. या चॉकलेटच्या एका बॉक्सची किंमत 38 हजार रुपये आहे.
जगातल्या सर्वांत महागड्या चॉकलेट बॉक्सच्या यादीत ले चॉकलेट बॉक्सचा समावेश होतो. हा बॉक्स खास पद्धतीनं सजवलेला असल्याने आणि दागिन्यांमुळे महाग असतो.यासोबतचा हिऱ्याचा हार, अंगठ्या आणि ब्रेसलेट हे हिरे, पन्ना आणि नीलमपासून बनवलेले असतात. ही इतकी मौल्यवान वस्तू असली तरी विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने खरेदी करता येत नाही. या चॉकलेट बॉक्सच्या किमतीविषयी बोलायचं झालं तर भारतात त्याची किंमत 11 कोटी 20 लाख रुपये आहे.
जगाच्या इतिहासातल्या सर्वांत महाग चॉकलेटपैकी एक म्हणून फ्रोजन हाउतेची ओळख आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वांत महाग चॉकलेट म्हणून याची नोंद झालेली आहे. हे चॉकलेट 28 प्रकारच्या कोकोचं मिश्रण आणि 23 कॅरेट खाण्याच्या सोन्यापासून बनवलं जातं. हे चॉकलेट ज्या बाउलमधून सर्व्ह केलं जातं तो सोन्यासह हिरेजडित असतो. या चॉकलेटचा आस्वाद घेण्याकरिता 18 लाख 68 हजार रुपये खर्च करावे लागतील.
गोल्डन स्पेकल्ड चॉकलेट या चॉकलेटची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हे चॉकलेट सर्वांत महागडं नॉनव्हेज चॉकलेट एग या नावानं ओळखलं जातं. 100 पौंडापेक्षा जास्त वजनाचं हे चॉकलेट तीन फूट लांब आणि दोन इंच रुंद असतं. याची किंमत 8 लाख 29 हजार रुपये आहे.
प्रीमियम मॅडागास्कन कोको बियांपासून तयार केलेलं कॅडबरी व्हिस्पा गोल्ड हे चॉकलेट सोन्याच्या कागदानं आच्छादित केलेलं असतं. हे अत्यंत किमती कॅडबरी चॉकलेट वर्ल्ड चॉकलेट 3 म्युझियममध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्याची किंमत 1 लाख 19 हजार रुपये आहे.