होळी आता तोंडावर आली आहे आणि 'यावर्षीचा दुर्मीळ होळी योग आहे, जो तब्बल 2,588 वर्षांनंतर येत आहे.' हे आम्ही नाही तर सोशल मीडियावरील पोस्ट सांगत आहे. या दुर्मिळ होळी योगाला काहीतरी विशेष करण्यासाठी देखील यामध्ये सांगितलं गेलं आहे, ज्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक सरसावले.
इतक्या वर्षांनी येणारा होळी योग अर्थात स्पेशल असणार आणि त्यामुळे या दिवशी काय करावं लागणार हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
advertisement
इंस्टाग्रामवर विनय सिंग मकवाना नावाच्या एका वापरकर्त्याने एका जुन्या वर्तमानपत्रातील कात्रणाची पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, 2588 वर्षांनी येणारा हा अद्भुत योग आहे, जो यावर्षीच्या होळीला खास बनवतो. हा योग आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतो, असं देखील सांगितलं जात आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, होळीच्या रात्री होलिका दहन करताना एक खास उपाय केल्यास भूक न लागणे, झोप न येणे, डोळ्यांचे विकार आणि आळस यांसारख्या समस्या दूर होतील.
हा उपाय अगदी सोपा आहे पण तितकाच अजबही आहे. होलिका दहन सुरू असताना, आपला मोबाईल फोन आपल्या स्वत:च्या डोक्याभोवती गोलगोल फिरवा, असं सात वेळा करा आणि तो फोन आगीत टाका. ऐकून धक्का बसला ना? पण घाबरु नका तुमचा खरा फोन आगीत टाकायचा नाही तर तुम्हाला खोटा फोन टाकायचा आहे, असं केल्याने दोन दिवसांत चिडचिड, मळमळ यांसारख्या तक्रारी दूर होतील असा दावा या पोस्टमध्ये केला आहे.
या अशा अजब-गजब पोस्टने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि अनेकांना याची मजेशीर बाजूही आवडली आहे.
एका आठवड्यात या पोस्टला 2 लाखांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाले आहेत. अनेकजणांनी कबूल केले की सुरुवातीला त्यांना ही पोस्ट खूप गंभीर वाटली होती आणि ते हा उपाय करून पाहण्यास उत्सुक होते. पण नंतर ही एक मजेशीर गोष्ट असल्याचं समोर आलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहेत. काही लोक याला मजेदार म्हणत आहेत. तर काही लोक काय हा मुर्खपणा? असं म्हणून सोडून देत आहेत.
हा विनोद सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे. इथे शेअर केल्या गेलेल्या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी, उत्सवाच्या मूडमध्ये ही पोस्ट लोकांमध्ये आनंद वाटणारी आहे.