औरंगाबाद येथील वरपक्षाची वरात शनिवारी रात्री बुलंदशहर इथे पोहोचली. रात्री आठ वाजता मौलवींच्या समोर निकाहचं वाचन करण्यात आलं. वधू आणि वरपक्षातील मंडळींनी जल्लोष केला. त्यानंतर वधुवरांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. रात्री साडेदहाच्या दरम्यान नवऱ्या मुलाची आजी एका खुर्चीवर बसली होती. तेव्हा नवरीमुलीच्या कुटुंबातील एका तरुणाने येऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला याच खुर्चीवर बसायचं आहे म्हणून तो तरुण हटून बसला. इथे वादाची ठिणगी पडली. या ठिणगीतून भांडण सुरु झालं ते थेट घटस्फोट झाल्यानंतरच थांबलं.
advertisement
झालं असं की, निकाहसाठी वधूपक्ष आणि वरपक्षातील मंडळी जमली होती. लग्न म्हटलं की मानापमान आलेच. नवऱ्या मुलाची आजी ज्या खुर्चीवर बसली होती तीच खुर्ची नवऱ्या मुलीकडच्या एका तरुणाला बसायला हवी होती. त्याने खुर्ची मागितली. आजीने खुर्ची द्यायला नकार दिला. त्यातून वाद सुरू झाला. हे प्रकरण चांगलंच तापलं आणि शेवटी दोन्ही पक्षांत भांडणं जुंपली. नंतर नवरा मुलगाही मध्ये पडला. नवरा मुलगा आणि त्याचा भाऊ यांनी नवऱ्या मुलीकडील मंडळींना शिवीगाळ केली.
गोष्टी जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत गेल्या. त्यानंतर वधूपक्षातील मंडळीही खवळली. एवढं सगळं झाल्यानंतर दुखावलेल्या नवऱ्या मुलीनेही मग चक्क सासरी जायलाच नकार दिला. आता वधूपक्षातील मंडळींनी वरासह त्याच्या घरातील मंडळींना डांबून ठेवलं आणि लग्नाचा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्याचा प्रयत्नही सुरु केला. शेवटी कसंबसं ज्येष्ठांच्या मध्यस्थीनंतर वराकडील मंडळींनी थोडे पैसे वधूच्या कुटुंबाला दिले आणि जागीच नवदाम्पत्याचा घटस्फोटही झाला. या प्रकरणात पोलीस केस न झाल्यामुळे कारवाईचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
