उद्योगजगतातल्या फोर्ब्ज या मासिकाने 2023 मधल्या जगातल्या सर्वांत प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत चार भारतीय महिलांचा समावेश आहे. ही यादी आणि त्यातले रँक ठरण्यासाठी फोर्ब्जनं चार निकष निश्चित केले होते. त्यात पैसा, मीडिया, प्रभाव आणि संबंधित क्षेत्रातलं कार्य यांचा समावेश होता. भारतातल्या चार प्रभावशाली महिलांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आयटी कंपनी एचसीएल टेकच्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा, सरकारी कंपनी सेलच्या अध्यक्ष सोमा मंडल आणि औषध कंपनी बायोकॉनच्या संस्थापिका किरण मझुमदार-शॉ यांचा समावेश आहे.
advertisement
Womens Day : 'या' आहेत भारतातील 10 सर्वात श्रीमंत महिला, पहिलं नाव वाचून वाटेल आश्चर्य
70 वर्षाच्या किरण मझुमदार-शॉ या एक प्रमुख भारतीय अब्जाधीश उद्योजिका आहेत. त्या बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेड या औषध कंपन्यांच्या संस्थापिका आहेत. बायोटेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये त्यांची भूमिका असून त्याशिवाय त्यांनी बेंगळुरूतल्या आयआयएमच्या अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. किरण मझुमदार -शॉ यांना विज्ञान आणि रसायनशास्त्रातल्या योगदानासाठी 2014मध्ये ओथमर सुवर्णपदकासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना 2011मध्ये फायनान्शियल टाइम्सच्या बिझनेस लिस्टमध्ये टॉप 50 महिलांमध्ये स्थान देण्यात आलं होतं. फोर्ब्जने त्यांना 2019 मध्ये जागतिक स्तरावरच्या 68व्या सर्वांत प्रभावशाली महिला म्हणून ओळख मिळवून दिली. 2023 मध्ये त्या 76व्या स्थानावर आहेत.
60 वर्षांच्या सोमा मंडल सेल या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिला महिला आहेत. त्यांचा जन्म भुवनेश्वरमध्ये झाला. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवलेल्या मंडल यांना धातू क्षेत्रातल्या कामाचा 35 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी नाल्कोतून करिअरला सुरुवात केली आणि 2017मध्ये सेलमध्ये येण्यापूर्वीच त्या संचालक (कर्मशिअल) बनल्या. त्यांना 2003मध्ये ईटी प्राइम वूमन लीडरशिप अॅवॉर्ड्समध्ये `सीईओ ऑफ द इयर`ने गौरवण्यात आलं. या वर्षी त्या फोर्ब्जच्या यादीत 70 व्या क्रमांकावर आहेत.
42 वर्षांच्या रोशनी या भारतीय अब्जाधीश आणि एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्षा आहेत. भारतातल्या लिस्टेड आयटी कंपनीचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. फोर्ब्ज सातत्यानं जगातल्या प्रभावशाली महिलांच्या यादी रोशनी यांचा समावेश करत आलं आहे. त्या फोर्ब्जच्या यादीत 2019मध्ये 54व्या, 2020मध्ये 55व्या आणि 2023मध्ये 60व्या स्थानावर आहेत.
64 वर्षांच्या निर्मला सीतारमण भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपच्या एक ज्येष्ठ नेत्या आहेत. तसंच 2019 पासून त्या देशाच्या अर्थमंत्री आहेत. इंदिरा गांधींनंतर त्या देशाच्या दुसऱ्या संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री ठरल्या. 2022मध्ये फोर्ब्जने जगातल्या सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीत सीतारमण यांना 36वं स्थान दिलं. 2023मध्ये त्या 32व्या स्थानावर आहेत.
