खरं तर रेल्वेनं प्रवास केलेल्या प्रत्येकानं सीटच्या वर असणारी एक साखळी पाहिली असेल. पूर्वी ही साखळी प्रत्येक केबिनमध्ये होती, पण आता ती फक्त काही केबिनमध्येच दिसते. या साखळीच्या जवळ ‘गाडी थांबवण्यासाठी साखळी ओढा!’ अशा आशयाची एक ओळ लिहिलेली असते. एखाद्या चित्रपटामध्ये तुम्ही रेल्वेची ही साखळी ओढताना एखाद्या कलाकाराला पाहिले देखील असेल. कदाचित तुम्ही रेल्वे प्रवास करताना देखील कोणीतरी किंवा तुम्ही स्वतःही ती साखळी ओढली असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, त्या साखळीत असं काय आहे, जी ओढल्यामुळे ट्रेन थांबते?
advertisement
लग्नाचं वऱ्हाड नेण्यासाठी रेल्वेचा संपूर्ण कोच बुक करायचा की सीट? काय स्वस्त पडतं?
साखळी ओढल्यानंतर ट्रेन कशी थांबते?
द हिंदू वेबसाइटच्या वृत्तानुसार, ट्रेनच्या डब्यात असणारी साखळी ट्रेनच्या मुख्य ब्रेक पाईपला जोडलेली असते. या पाईपमध्ये ॲब्सोल्युट प्रेशर असतं. साखळी ओढताच, ब्रेक एअर पाईपमधील व्हॉल्व्ह उघडतो आणि हवा बाहेर येते. त्यामुळे ब्रेकमधील हवेचा दाब कमी होऊ लागतो आणि ट्रेनचा वेग कमी होतो. ट्रेनमध्ये असणारा लोको पायलट नेहमी प्रेशर मीटरचे निरीक्षण करत असतो, त्याला जेव्हा हवेच्या प्रेशरमध्ये बदल झाल्याचं दिसतं त्यावेळी तो तीन वेळा हॉर्न वाजवून ट्रेनमध्ये उपस्थित असणारे गार्ड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सिग्नल देतो की ट्रेनची साखळी ओढली गेली असून ट्रेन थांबवण्यात येत आहे. जेव्हा एखादी ट्रेन खूप वेगानं धावत असते तेव्हा ती रुळावरून घसरू नये, यासाठी तिला थांबायला काही मिनिटं लागतात.
साखळी ओढल्यामुळे ट्रेन थांबल्यानंतर प्रवासी का उतरत नाहीत?
साखळी ओढून ट्रेन थांबवून प्रवासी का उतरत नाहीत, असा प्रश्नही अनेकांना पडतो. म्हणजेच कोणाचे घर जर रेल्वे रुळाजवळ असेल किंवा एखाद्या स्टेशनवर ट्रेन थांबणार नसेल, तर तिथं साखळी ओढून प्रवासी का उतरत नाहीत, असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. तर, काही प्रवाशांकडून तसं करण्यात येत असलं तरी हे खूप धोकादायक आहे. तसंच कायद्यानुसार तसं करणं गुन्हा आहे. खरं तर ट्रेनची साखळी ओढण्याची सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. ट्रेनमध्ये आग लागल्यावर, एखाद्या प्रवाशाला आरोग्याची समस्या उद्भवल्यास, ट्रेनमध्ये एखादा गुन्हा घडत असल्यास, ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना दुर्घटना घडली, तरच साखळी ओढून ट्रेन थांबवणे योग्य आहे. अन्यथा रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 नुसार विनाकारण साखळी ओढणाऱ्या प्रवाशाला एक वर्षाचा तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.