BMC Election: मराठी अभिनेत्री मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात, भाजपकडून उमेदवारी जाहीर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mumbai Municipal Corporation Election : रविवारी रात्री भाजपने काही उमेदवारांना एबी फॉर्म्स दिले आहेत, ज्यामुळे निवडणूकांबाबत उत्साह निर्माण झाला आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाराष्ट्रातील मानाच्या निवडणुकांपैकी एक असून या निवडणुकीसाठी आता भाजपने आपली कंबर कसली आहे. भाजपच्या ६६ उमेदवारांची पहिली अनौपचारिक यादी समोर आली आहे. रविवारी रात्री भाजपने काही उमेदवारांना एबी फॉर्म्स दिले आहेत, ज्यामुळे निवडणूकांबाबत उत्साह निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात जागावाटपाची खलबतं सुरू होती. काही जागांवरून दोन्ही पक्षांत पेच असला तरी, ज्या जागांवर एकमत झालं आहे, तिथे भाजपने वेळ न घालवता आपल्या उमेदवारांना मैदानात उतरवलं आहे. दादरच्या पक्ष कार्यालयात उमेदवारांना बोलावून त्यांच्या हाती एबी फॉर्म सोपवण्यात आले. या पहिल्या ६६ जणांच्या ताफ्यात अनेक अनुभवी माजी नगरसेवक तर आहेतच, पण या यादीत मनोरंजन विश्वातील अभिनेत्रीचं नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
रंगमंचावरून थेट राजकारणात एन्ट्री
या यादीतलं सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निशा परुळेकर. ज्यांनी आजवर नाटकाच्या रंगमंचावर आणि सिनेमाच्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकली, त्या आता राजकारणाच्या आखाड्यात आपले नशीब आजमावणार आहेत.
advertisement
निशा परुळेकर यांनी भरत जाधव यांच्यासोबत 'सही रे सही' सारख्या तुफान गाजलेल्या नाटकात काम केलं आहे. २०१७ मध्ये त्यांचे 'महानायक' आणि 'शिमणा' हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. कोठारे व्हिजन यांनी निर्मिती असलेल्या 'दक्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचे पात्र साकारले होते. अभिनयाच्या क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्यानंतर आता थेट जनसेवेसाठी त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला निवडणुकीच्या रिंगणात पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतापासूनच उत्सुक झाले आहेत.
advertisement
advertisement
मुंबईत निवडणुकांचा धुरळा
महायुतीमध्ये जागावाटपाचा आकडा सध्या २०७ पर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे, ज्यामध्ये भाजप १२८ आणि शिवसेना ७९ जागा लढवण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित २० जागांवरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपने आपल्या ६६ उमेदवारांना फॉर्मचं वाटप करून विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण केला आहे.
या यादीत तेजस्वी घोसाळकर, मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या पत्नी हर्षिता नार्वेकर अशा वजनदार नावांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. जुन्या जाणत्या नगरसेवकांना पुन्हा संधी देतानाच, निशा परुळेकर यांच्यासारख्या नवीन चेहऱ्याला देऊन भाजपने मिक्स कार्ड खेळलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 12:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BMC Election: मराठी अभिनेत्री मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात, भाजपकडून उमेदवारी जाहीर











