महाराष्ट्रातील या गावात बाबासाहेबांच्या अस्थी कशा आल्या? पाहा तेव्हा नेमकं काय घडलं होतं Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आता हे गाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी तीर्थस्थान ठरलं आहे. कारण इथेच बाबासाहेबांच्या काही अस्थी जतन करून ठेवलेल्या आहेत.
अमरावती : अमरावतीपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेले नया अकोला हे छोटंसं गाव. आता हे गाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी तीर्थस्थान ठरले आहे. कारण इथेच बाबासाहेबांच्या काही अस्थी जतन करून ठेवलेल्या आहेत. दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि 9 डिसेंबरला अस्थिस्थापना दिनी येथे हजारो भाविक दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात. पण, सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की, बाबासाहेबांच्या अस्थी येथे आल्या तरी कशा? यामागे एक स्टोरी आहे त्याबाबत जाणून घेऊ.
अस्थी नया अकोलात कशा आल्या? याबाबत माहिती नया अकोला येथील ग्रामस्थ रविंद्र वानखडे यांनी दिली. ते सांगतात की, 1956 मध्ये बाबासाहेबांच्या निधनानंतर दादर चौपाटीवर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू होती. त्याच वेळी अमरावतीतील दोन तरुण विद्यार्थी पिरकाजी खोब्रागडे आणि धोंडोजी छापामोहन बातमी समजताच थेट बडनेरा स्टेशनवर गेले आणि मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रेनमध्ये बसले.
advertisement
मुंबईला पोहोचल्यावर दोघेही बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. पहाटे अस्थी संकलन सुरू झाल्यानंतर त्यांनी अत्यंत आदरभावाने काही अस्थी उचलून स्वतःजवळ ठेवल्या आणि 9 डिसेंबरला अमरावतीत परतले. पिरकाजी यांनी आपल्या गाव नया अकोला येथे पोहोचून आईला त्या अस्थी दाखवल्या. बाबासाहेब गावकऱ्यांचेही आहेत, असे म्हणत आईने त्या अस्थी सार्वजनिक ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला. ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्या अस्थी गावातील एका ठिकाणी सन्मानपूर्वक पुरल्या. त्यावर छोटासा ओटा बांधून ते स्थान जतन करण्यात आले.
advertisement
अस्थींचे स्थळ आज पवित्र स्मारक
काळानुसार या छोट्या ओट्याचे रूपांतर भव्य सभागृहात झाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रस्ताव आणल्यानंतर नया अकोलाला क वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्यात आले. जिल्हा परिषदेकडून दहा लाख निधी मिळाल्यानंतर येथे सभामंडप उभारण्यात आला. या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शनस्थळ, भगवान बुद्धांची भव्य मूर्ती, अस्थी अमरावतीत आणणारे पिरकाजी खोब्रागडे यांचे छायाचित्र अशा व्यवस्थांची सजावट करण्यात आली आहे.
advertisement
सेना सेवेत गेले दोघेही साथीदार
अस्थी अमरावतीत आणणारे पिरकाजी आणि धोंडोजी हे दोघेही पुढे सैन्यात दाखल झाले. आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांनी बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेतील अनुभव जपून ठेवले होते. धोंडोजी यांनी सांगितलेला हा प्रसंग आजही नया अकोला गावात अभिमानाने सांगितला जातो.
नया अकोला गावाला तीर्थक्षेत्राची ओळख
view commentsभंते आणि अनुयायांनी केलेल्या विनंतीनंतरही गावकऱ्यांनी अस्थी गावातच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. ग्रामस्थांनी केलेले जतन, शासनाचा पाठिंबा आणि अनुयायांचा भावनिक संबंध यामुळे नया अकोला आज आंबेडकर अनुयायांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
December 05, 2025 4:15 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
महाराष्ट्रातील या गावात बाबासाहेबांच्या अस्थी कशा आल्या? पाहा तेव्हा नेमकं काय घडलं होतं Video

