चाकणकरांच्या कथित कॉल रेकॉर्डिंगवरून अंधारे-दमानियांमध्ये जुंपली, दोघींकडूनही एकमेकांवर फायरिंग!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राजकीय नेत्यांचे अशोक खरातसोबतच्या कथित कॉल रेकॉर्डवरून सुषमा अंधारे-अंजली दमानिया यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगले आहे.
मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतर त्याला कुणी कुणी फोन केला, तो कुणाच्या संपर्कात होता, याची माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याचे नेत्यांबरोबरचे कथित 'सीडीआर' समोर आणले. या सीडीआरमध्ये रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी नेत्यांची नावे होती. मात्र दमानियांकडे ही माहिती कुठून आली? असा सवाल संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. जी माहिती एसआयटीकडे नाही, ती माहिती दमानिया यांच्याकडून कुठून येते? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना अंजली दमानिया यांनी एआय टूल वापरून कॉल रेकॉर्ड डिटेल्स काढल्याचे सांगितले. खरात प्रकरणातल्या कथित कॉल रेकॉर्डवरून सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगले आहे.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
संजय राऊत जी, मी जेव्हा जेव्हा लढते, माझ्याकडे असंख्य माहिती येते आणि ती कुठल्याही कार्यालयाकडनं येत नाही, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं येत नाही. मी 'रॉ'ची एजंट नाही. मी एक वेडी स्त्री आहे, की जिला वाटतं देश कुठेतरी बदलावा, घडावा. आणि मला प्रश्न पडतात की, अशोक खरात यांच्याकडे हे सगळे राजकारणी मंडळी का गेली होती? हे सगळे जे फोटो आले, व्हिडिओ आले, त्यात एकनाथ शिंदे दिसले, दीपक केसरकर दिसले, चंद्रकांत पाटील दिसले, जयंत पाटील दिसले. हे सगळेजण त्यांच्याकडे गेले होते आणि का गेले? हा प्रश्न आहे.
advertisement
आता मला जो CDR (Call Data Record) मिळाला, ज्याच्यात मी AI टूल वापरून, त्याच्यात जे जे फोटो होते त्यांची नावं शोधली. ती शोधल्यानंतर मला एकनाथ शिंदेंचे १७ कॉल मिळाले. त्यात मी काय करू? बाहेर नको आणू? का तर तुम्हाला वाटेल की मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मला मिळाली म्हणून? मला असं वाटतं ना, हे फालतू प्रश्न विचारणं आता तुम्ही बंद करा. प्रश्न हे विचारा की शिंदेंनी १७ कॉल कशासाठी केले? २१ मिनिटं ते काय बोलले? हे प्रश्न नाही पडत तुम्हाला? कारण हे सरकार शिंदे चालवतायत, अंजली दमानिया नाही. त्यामुळे मी शिंदेंना नक्कीच प्रश्न विचारणार, त्यात तुम्हाला त्रास व्हायचं काही एक कारण नाही, असा पलटवार दमानिया यांनी केला.
advertisement
सुषमा अंधारे मला म्हणतात की, मला भाजपची त्याच्यात नावं नाहीत. त्याच्यात चंद्रकांत पाटलांचं नाव आहे की त्यांनी ८ कॉल केले, सुनील तटकरेंचं नाव आहे की त्यांनी ८ कॉल केले, आशिष शेलारांचं नाव आहे की त्यांनी १ कॉल केला. अंधारेंना वाटत असेल तर त्यांनी मला नंबर्सची अख्खी यादी द्यावी, त्याची सगळी चौकशी करून मी त्यांच्याकडे पाठवते. अंधारे आणि राऊतांनी काहीही बोलणं आता बंद करावं. विषयावर बोलावं की उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खरात सारख्या माणसाला का फोन केले होते?" असा सवाल दमानिया यांनी अंधारे यांना विचारले.
advertisement
सुषमा अंधारे यांचा दमानियांवर पलटवार
तुम्हाला माहिती देणारा माणूस कोण आणि एसआयटी पेक्षाही अत्यंत वेगाने तुमच्यापर्यंत माहिती कशी पोहोचवू शकला? तुमच्याकडे आलेल्या नावांमध्ये बरोबर सीएमच्या लॉबीमध्ये नसलेली दोन नाव आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील एवढीच कशी येता? असं कोणतं ॲप आहे की ज्यामध्ये नंबर टाकल्यानंतर तो नंबर किती वेळा डायल झाला किती कालावधीसाठी त्यावरून बोलणं झालं हे कळतं. कोणता कॉल आला कोणता कॉल गेला हे समजू शकतं हे आम्हालाही एकदा सांगा ना... एसआयटी पेक्षा वेगवान माहिती आणि अगदी कालच्या कालावधी सकटची माहिती तुमच्याकडे येत असेल तर माझी सरकारला विनंती आहे तेजस्विनी सातपुते या अगदीच काम करत नाहीत असा याचा अर्थ आहे. तेव्हा सातपुतेंच्या ऐवजी तुम्हालाच SIT चे प्रमुख करायला काय हरकत आहे बरं? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत अंधारे यांनी दमानियांना धारेवर धरले.
advertisement
तुमचा लढा सिलेक्टीव असतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे कारण कोरेगाव पार्कमध्ये लढणाऱ्या तुम्ही जैन बोर्डिंग मध्ये गप्प होतात. तसेच खरात प्रकरणात नार्वेकरांच्या बद्दल तुम्ही नक्कीच बोला पण मग खरात सोबत अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आले यावर तुमचे म्हणणे अजूनही आले नाही पुढे, असा टोलाही त्यांनी लगावला.
advertisement
31 मार्च 2018 च्या यादीनुसार क वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा जयकुमार रावलांच्या काळात मिळाला. 2012 ला मिळालेल्या बंदूक परवाना 2022 ला त्याचं नूतनीकरण फडणवीसंच्या काळात झालं हे तुम्ही अजिबात अधोरेखित केलं नाही. त्यामुळे बात निकलेगी तो दूर तलक जायेगी. सत्ताधाऱ्यांशी असणारी तुमची जवळीक ही आता कुणापासूनही लपून नाही, हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही ये पब्लिक है सब जानती है... अशी टोलेबाजी अंधारे यांनी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 8:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चाकणकरांच्या कथित कॉल रेकॉर्डिंगवरून अंधारे-दमानियांमध्ये जुंपली, दोघींकडूनही एकमेकांवर फायरिंग!









