अतूट नातं! मृत्यूशी झुंजणाऱ्या नवऱ्यासाठी ‘सावित्री’ झाली, किडनी देऊन वाचवला जीव!
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि समर्पण किती महान असू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
बीड: पती-पत्नीचं नातं म्हणजे सात जन्मांची साथ मानली जाते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सावित्री ‘यमराजा’ला सामोरं गेल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. तसेच बीडच्या आधुनिक सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवले आहेत. वर्षा पाटील असं हराळी येथील या आधुनिक सावित्रीचं नाव असून तिनं पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दिली. त्यांच्या या निर्णयाने नात्यातील निष्ठा, प्रेम आणि त्याग यांचे जिवंत उदाहरण समाजासमोर आले आहे.
हराळी गावचे रहिवासी राहुल पाटील (वय 45) यांचा संसार समाधानात सुरू होता. मात्र, मागील वर्षभरापासून त्यांच्या आरोग्यात सातत्याने बिघाड होत गेला. वैद्यकीय तपासणीत दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. नियमित डायलिसिस करूनही प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. ही बातमी कुटुंबासाठी धक्कादायक ठरली. घरचा कर्ता पुरुष आजारपणामुळे खचल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत सापडले होते.
advertisement
या कठीण प्रसंगी पत्नी वर्षा पाटील (वय 40) यांनी खचून न जाता धाडसी निर्णय घेतला. चिंचोली भुयार (जि. धाराशिव) हे माहेर असलेल्या वर्षा यांनी पतीच्या उपचारासाठी स्वतः पुढाकार घेतला. “पतीचे प्राण वाचवणे हेच माझे कर्तव्य,” या भावनेतून त्यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय तपासण्या आणि आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्या दात्या म्हणून पात्र ठरल्या. या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाला आशेचा नवा किरण मिळाला.
advertisement
21 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने वर्षा पाटील यांची एक किडनी काढून ती राहुल पाटील यांना प्रत्यारोपित केली. शस्त्रक्रियेनंतर दोघांचीही प्रकृती समाधानकारक असून, राहुल पाटील यांना अक्षरशः नवे आयुष्य मिळाले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुढील काळात योग्य काळजी घेतल्यास दोघेही सामान्य जीवन जगू शकतील.
advertisement
आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या काळात वर्षा पाटील यांनी दाखवलेला हा त्याग केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहिलेला नाही. पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि समर्पण किती महान असू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. हराळी गावासह संपूर्ण परिसरात वर्षा पाटील यांच्या धैर्याचे आणि निर्णयाचे कौतुक होत असून, अनेकांसाठी त्या ‘आधुनिक सावित्री’ ठरत आहेत.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 4:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
अतूट नातं! मृत्यूशी झुंजणाऱ्या नवऱ्यासाठी ‘सावित्री’ झाली, किडनी देऊन वाचवला जीव!










