आधी मदतीला आले पण अचानक फिरली नियत, नागपुरात इंजिनिअरींगच्या 3 विद्यार्थ्यांकडून व्यापाऱ्याची हत्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
उपराजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. इथं इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांनी मिळून एका ४४ वर्षीय व्यापाऱ्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे.
नागपूर: उपराजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. इथं इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांनी मिळून एका ४४ वर्षीय व्यापाऱ्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून व्यापाऱ्याचं डोकं दगडाने ठेचलं. तसेच व्यापाऱ्याच्या अंगावरील कपडे काढून नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिला. हा मृतदेह आढळल्यानंतर अवघ्या १२ तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
सुचित भोजापुरे असं हत्या झालेल्या ४४ वर्षीय मृत व्यापाऱ्याचं नाव आहे. त्यांचा ऑटो स्पेअर पार्टचा व्यवसाय होता. घटनेच्या दिवशी भोजापुरे यांनी मद्यप्राशन केलं होतं. ते दारुच्या नशेत आपल्या कारसह वर्धमान नगर येथील पुलावर होते. आरोपींची नजर भोजापुरे यांच्यावर पडली. त्यांनी मदत करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याची हत्या केली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असून त्यांनी नुकतीच दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यानंतर तिघेही एकत्र फिरत असताना त्यांना वर्धमान नगर पुलावर सुचित भोजापुरे हे मद्यधुंद अवस्थेत दिसले. यावेळी मदतीच्या बहाण्याने हे विद्यार्थी भोजापुरे यांच्या कारमध्ये बसले. त्यांनी कार प्रथम भिवापूरच्या दिशेने नेली आणि पुन्हा वाडी परिसरात आणली.
advertisement
कारच्या लालसेपोटी बदलला प्लॅन
प्रवासादरम्यान भोजापुरे यांच्या पत्नीचा फोन आला होता. सुरुवातीला आरोपींनी त्यांना घरी सोडण्याचा विचार केला होता, मात्र फोन कट झाल्यानंतर त्यांच्या मनात कार आणि महागडा मोबाईल पाहून पाप आले. केवळ कारच्या मोहापायी त्यांनी व्यापाऱ्याचा खून करण्याचा प्लॅन आखला.
स्मशान घाटाजवळ निर्घृण हत्या
आरोपींनी भोजापुरे यांना वाडी परिसरातील खडगाव मार्गावरील स्मशान घाटाजवळ नेले. तिथे एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्या डोक्यावर दगडाने सात वार केले. हत्या केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृताचे कपडे काढून फेकून दिले आणि मृतदेह झुडपात फेकला. त्यानंतर तिघेही कार आणि मोबाईल घेऊन फरार झाले.
advertisement
पोलिसांचा १२ तासांत थरारक तपास
दुसऱ्या दिवशी एका नागरिकाला नग्नावस्थेत भोजापुरे यांचा मृतदेह आढळल्यानंतर वाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. मृताच्या पत्नीने ओळख पटवल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचला. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तपासात समोर आले की, मुख्य आरोपी हा 'झोमॅटो'मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. उच्चशिक्षित तरुणांनी अशा प्रकारे गुन्हेगारी मार्गाचा अवलंब केल्याने नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 12:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी मदतीला आले पण अचानक फिरली नियत, नागपुरात इंजिनिअरींगच्या 3 विद्यार्थ्यांकडून व्यापाऱ्याची हत्या






