देवा रे! नैवेद्य समजून बैलाने मंगळसूत्र गिळलं, 2 तासांचं ऑपरेशन, 14 दिवसानंतर नेमक काय घडल?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बैलाने मंगळसूत्र गिळले होते. 14 दिवसानंतर ऑपरेशन करून ते बाहेर काढण्यात यश आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : पाडव्याच्या दिवशी पूजा आणि औक्षणाच्या शुभक्षणात झालेली एक अविश्वसनीय घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे. सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे एका बैलाने महिलेच्या हातातील सोन्याचे मंगळसूत्र गिळल्याने कुटुंबीय अक्षरशः हादरले. तब्बल 14 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ऑपरेशनद्वारे हे मंगळसूत्र बैलाच्या पोटातून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. या चमत्कारिक घटनेनंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
22 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजनाच्या निमित्ताने शेतकरी केवलसिंह श्रीभान चिल्हारे यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा सुरू होती. औक्षण करताना सोन्याचे मंगळसूत्र बैलाच्या माथ्याला अर्पण करण्यासाठी घेतले असता, बैलाने ते नैवेद्य समजून गिळून टाकले. कुटुंबाने सुरुवातीला ते शेणातून पडेल अशी आशा धरली, पण दिवसेंदिवस प्रतीक्षा वाढत गेली आणि काळजी वाढत होती. म्हणून अखेर पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला.
advertisement
सेवानिवृत्त सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. एल. पाटेवाड यांनी 5 नोव्हेंबर रोजी बैलाची तपासणी करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. तब्बल दोन तासांच्या नाजूक शस्त्रक्रियेनंतर सोन्याचे मंगळसूत्र सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. मंगळसूत्र मिळालेच, पण त्याहून मोठं म्हणजे बैलाचे प्राणही वाचले.
advertisement
या शस्त्रक्रियेसाठी सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च आला, मात्र कुटुंबासाठी हा पैसा नव्हे तर भावनिक दिलासा ठरला. “बैल आमचा जिवलग आहे... त्याचे प्राण वाचले हेच खरे धन आहे,” असे चिल्हारे कुटुंबाने समाधान व्यक्त केले. ही घटना केवळ आश्चर्यकारक नाही, तर माणूस आणि जनावरामधील नात्याचं भावनिक दर्शन घडवणारी ठरली आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 06, 2025 11:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
देवा रे! नैवेद्य समजून बैलाने मंगळसूत्र गिळलं, 2 तासांचं ऑपरेशन, 14 दिवसानंतर नेमक काय घडल?











