राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Co Operative Societies Election: राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील शेतीविषयक कामात व्यस्त असल्याने अशा शेतकऱ्यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.
तुषार रुपनवर, प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. राज्यातील पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शासनाने परिपत्रक काढून दिली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती विचारात घेऊन ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे. अशा संस्था, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे अशा संस्था तसेच ज्या प्रकरणी संस्थेची निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालय, मा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत अशा संस्था वगळून महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम, २०१४ मधील नियम ४ मध्ये नमूद केलेल्या 'अ' व 'ब' वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक या आदेशाच्या दिनांकापासून सध्या ज्या टप्यावर आहे त्या टप्प्यावर दि. ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे शासनाने परिपत्रकात म्हटले आहे.
advertisement
राज्य सहकारी निवडणूक कशी राबविण्यात येते?
राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रकिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७३ क मधील तरतुदीनुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पूणे यांच्या कार्यालयाकडून दि. २१५/०७/२०२५ रोजी शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असणा-या सहकारी संस्थांची एकूण संख्या ३,१८८ असून त्यापैकी 'अ' व 'ब' वर्गातील सहकारी संस्थांची संख्या २८५ आहे.
advertisement
पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत निवडणूक पुढे ढकलणे उचित
महसूल व वन विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने दि. १८/०८/२०२५ अखेर राज्यातील ३० जिल्ह्यात सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून त्यापैकी १५ जिल्ह्यात सरासरीच्या १००% पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील शेतीविषयक कामात व्यस्त असल्याने अशा शेतकऱ्यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत (३० सप्टेंबर, २०२५) पुढे ढकलणे उचित होईल, अशी शासनाची धारणा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 20, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय